पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याची घटना येरवड्यात घडली. या प्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक केली. माशाक गाझीबक्ष विजापुरे (वय ४०, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश वसंत शिंदे याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माशाक आणि गणेश मित्र आहेत. दाेघे जण शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास येरवड्यातील कामराजनगर परिसरात दारू पित होते. या वेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. माशाकने आरोपी गणेश याला शिवीगाळ केली.

गणेशने शेजारी पडलेले दांडके उचलून माशाकच्या डोक्यात घातले. माशाकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. गणेशने त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने गणेश घाबरला आणि तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. माशाकला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

पसार झालेला आरोपी गणेश याला पोलिसांनी सायंकाळी अटक केली. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून त्याने मित्राच्या डोक्यात दांडके मारल्याचे पोलिसांना सांगितले.