पुणे : येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील कर्मचाऱ्यावर अल्पवयीनांनी हल्ला केल्याची घटना घडली. मारहाणीत निरीक्षण गृहातील कर्मचारी गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पं. जवाहराल नेहरु उद्योग केंद्रात (मुलांचे शासकीय निरीक्षणगृह) कुंभार हे कर्मचारी आहेत. रविवारी (१६ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते निरीक्षणगृहातील अल्पवयीनांना नाश्ता वाटत होते. त्या वेळी किरकोळ वादातून निरीक्षणगृहातील तीन अल्पवयीनांनी कुंभार यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक देठे तपास करत आहेत. गंभीर गुन्ह्यांत ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांना बाल न्याय मंडळाच्या आदेशाने येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात ठेवण्यात येते. यापूर्वी किरकोळ वादातून निरीक्षण गृहातील अल्पवयीनांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. निरीक्षणगृहातून अल्पवयीन पसार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
