पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने तरुणी, तसेच तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी, तसेच नियोजित पतीला छायाचित्रे पाठवून विवाह मोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
इम्रान रहमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपी इम्रान शेख याच्यााशी चार वर्ष प्रेमसंबध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह ठरविला. त्यामुले तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवू नको, माझा विवाह ठरला आहे, असे शेख याला सांगितले. त्यानंतर शेखने तरुणीला शिवीगाळ करुन धमकावले. ‘तुझा विवाह जमू देणार नाही. तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’, अशी धमकी दिली.
आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी शेखने तरुणीचा ज्याच्याशी विवाह ठरला होता. त्याला प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठविली. नियोजित पतीने विवाह मोडला. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.
कर्वे रस्त्यावर ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पादचारी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण अहिल्यानगरमधील लोणी प्रवरा गावचा रहिवासी आहे. तरुणाची आई कामानिमित्त पुण्यात आली होती. १ जानेवारी रोजी तक्रारदार तरुणाची आई कर्वे रस्त्यावरुन निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत. शहर परिसरात वर्षभरापासून महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी
पीएमपी प्रवासी महिलेकडील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नारायण पेठ परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला शनिवार पेठेत राहायला आहेत. त्या सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास वारजे ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान त्यांचे ३५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविले. केळकर रस्त्यावरील बस थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा मंगळसूत्र चाेरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.

