पुणे : ‘हृदयविकारांच्या उपचारक्षेत्रात लेझर तंत्रज्ञानामुळे पुढचे पाऊल टाकले गेले आहे. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीसारख्या पारंपरिक उपचारपद्धतींना पर्याय म्हणून लेझरद्वारे हृदयावरील शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होत आहेत. हृदय उघडण्याची गरज नसल्याने रुग्णांवरील शस्त्रक्रियेचा ताण आणि धोका कमी होत आहे. दुसरीकडे, मात्र, बदलती जीवनशैली आणि तणावामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, सुमारे २५ टक्के तरुण या आजाराच्या धोक्याच्या कक्षेत आहेत,’ असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
‘कार्डिओलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने हृदयविकाराची नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यात २५ टक्के हृदयविकार हे तरुणांमध्ये असल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले. भारतात कमी वयातही हृदयविकारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. पूर्वी वृद्धांमध्ये हदयविकाराचा धोका सर्रास आढळत होता. तो आता तरुणांमध्ये आढळत आहे. तसेच शहरी महिला वर्गामध्येही हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे तज्ज्ञ नमूद करत आहेत.
हृदयविकारावर आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. गेल्या दीड वर्षापासून लेझर उपचार पद्धती भारतात उपलब्ध असली, तरी आजही ‘आयुष्यमान भारत’, ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त या उपचारपद्धतीचा समावेश नसल्याचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित पळशीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘हदयविकार टाळण्याची चतु:सुत्री’
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश इमानदार यांनी चतु:सुत्री दिली आहे. ते म्हणाले, ‘नियमित व्यायाम आणि प्राणायाम करणे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहारावर नियंत्रण हवे. यामध्ये बेकरी उत्पादन, पॅकबंद अन्न, साखर, फास्टफूड वर्ज्य करावेत. हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, कडधान्ये, फळे यांचा मुबलक वापर हवा, तिसरी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण हवे, ताणतणाव संयमाने हाताळता यायला हवा. जर रागावर नियंत्रण नसले, तर उच्च रक्तदाब होऊ शकतो. तसेच, दररोज साडेसात ते आठ तास झोप हवी. चौथी बाब म्हणजे नियमित तपासणी करणे. यामध्ये रक्त चाचण्या, रक्तदाब तसेच हदयविकाराशी संबंधित तपासण्या करणे गरजेचे आहे. या चतु:सुत्री अंगिकारल्या, तर हृदयरोगच काय; पण इतर आजारही भेडसावणार नाहीत.’
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हदयरोगाचा धोका कमालीचा वाढला आहे. तरुण वयातच ताणतणाव वाढत आहेत. मोबाईलचा वाढता वापरही कारणीभूत ठरत आहे. आपल्याकडे चाळीशी-पन्नाशीनंतर तपासण्या केल्या जातात. मात्र, आता शालेय, महाविद्यालयीन मुलांना हदयरोगाचा धोका असल्याने शाळा आणि कॉलेज व्यवस्थापनानेच पुढाकार घेऊन तरुण वयोगटातील मुलांच्या तपासण्या करायला हव्यात. – अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन
अधिकाधिक रुग्ण अँजिओप्लास्टी करून घेत असून, त्यांचे आयुष्य वाढत असल्याने, पुन्हा हस्तक्षेपाची गरज भासणाऱ्या गुंतागुंतीच्या हृदय रक्तवाहिन्यांचा विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे अशा आव्हानात्मक प्रकरणांचे अधिक अचूकपणे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना २४ तासांत सोडले जाते. डॉ. अभिजित पळशीकर, संचालक, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हृदयरोग तज्ज्ञ
‘द लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?
महाराष्ट्रातील हृदयविकार या विषयावर गेल्या वर्षी ‘द लॅन्सेट’ने अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, राज्यात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून, ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उच्च रक्तदाब, मिठाचे अतिप्रमाण व प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन, फळे-भाज्यांची कमतरता आणि बैठी जीवनशैली ही हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत.
राष्ट्रीय सांख्यिकी संस्था, ‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ यांनी जारी केलेले महत्त्वाचे निष्कर्ष :
- गेल्या सात वर्षांत (२०१७ ते २०२५) भारतात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या जवळजवळ तीन पटींनी वाढली आहे. २०१७ मध्ये दर १ लाख लोकांमागे १,३३३ रुग्ण होते, जे २०२५ मध्ये ३,८९१ पर्यंत पोहोचले आहेत.
‘इंडियन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार, भारतातील ५० टक्के हृदयविकाराचे झटके ५० वर्षांखालील पुरुषांमध्ये येतात, तर २५ टक्के झटके ४० वर्षांखालील तरुणांमध्ये येतात.
- शहरी भागात हृदयविकाराचे प्रमाण (११.९ टक्के) हे ग्रामीण भागाच्या (१०.३ टक्के) तुलनेत जास्त आहे.
