जत्रेत झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली.
अजित शंकर कोळपे (वय २६, रा. जांभळी, भोर ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार अनिल कोळपे (वय २०) याच्यासह साथीदारां विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजितचे वडील शंकर (वय ५०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अजित आणि आरोपी ओंकार चुलतभाऊ आहेत. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी जांभळी गावातील जत्रेत अजित आणि ओंकार यांची भांडणे झाली होती. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अजित कोळपेला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातून तो जामीन मिळवून नुकताच बाहेर आला आहे. कात्रजमधील गुजरवाडी भागातील एका खासगी कंपनीत तो काम करतो. सकाळी आठच्या सुमारास तो कामावर जात होता. त्या वेळी आरोपी अनिल आणि त्याचे साथीदार गुजरवाडीत दबा धरून बसले होते. आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले आणि ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या अजितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत.