पुणे : अपमानास्पद वागणूक दिल्याने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

वाघोली पोलीस चौकीसमोर ही घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यात जाधव गंभीर भाजले होते. जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा…पुणे : एकतर्फी प्रेमाची अशीही तऱ्हा! प्रेमवीराचा तरुणीच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून पाठलाग

लोणीकंद पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. रोहिदास जाधव यांनी पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर जातीवाचक शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली केली होती.