पुणे : महापालिका भवन परिसरातून एका तरुणाने पीएमपी बस पळवून नेल्याची घटना घडली. पीएमपीच्या स्टेअरिंगजवळील लावलेली चावी चालक विसरुन गेला. तेथून निघालेल्या तरुणाने बस सुरू केली आणि महापालिका भवन, जंगली महाराज रस्त्यावरुन बस नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यापर्यंत नेले. गोखले स्मारक चौकात एक कार्यक्रम सुरू होता. पीएमपी बस पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोखले स्मारक चौकात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून बस अडविली. पीएमपी बस पळवून नेणाऱ्या उत्तराखंडमधील तरुणाला ताब्यात घेण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाविरुद्ध रात्री उशीरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ताब्यात घेण्यात आलेला २० वर्षीय तरुण मूळचा उत्तराखंडचा आहे. ‘वाघोली ते महापालिका भवन या मार्गावरील पीएमपी बस दुपारी महापालिका भवन येथील स्थानकात आली. संबंधित बसच्या चालकाला दुसऱ्या मार्गावरील बस चालविण्याची जबाबादरी सोपविण्यात आली. गडबडीत बसच्या स्टेअरिंगजवळ चावी ठेऊन तो तेथून गेला. बसमध्ये कोणी नसल्याची संधी उत्तराखंडमधील तरुणाने साधली. त्याने बस सुरू केली. महापालिका भवन, जंगली महाराज रस्ता, गोखले स्मारक चौकाापर्यंत आला. विरुद्ध दिशेने तो बस नेण्याचा प्रयत्नात होता. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना याबाबतची माहिती मिलाली होती. त्यांनी प्रसंगावधाना राखून बस चालक तरुणाला ताब्यात घेतले’, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.
या प्रकरणी मोटार वाहन कायदा, तसेच अन्य कलमांन्वये तरुणावरिुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांनी दिली.

संतोष मानेची आठवण

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातून २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने एसटी बस पळवून नेली होती. भरधाव एसटीने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. शंकरशेठ रस्ता, स्वारगेट परिसरात त्याने पादचारी, तसेच वाहनांना धडक दिली होती. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच २७ जण जखमी झाले होते.

बसची चावी सोडून जाणे हा निष्काळजीपणा आहे. या प्रकरणात संबंधित पीएमपी चालकाची प्रशासनाकडून चौकशी होईल. या प्रकरणात उत्तराखंडमधील तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. – कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक