राज्य वखार महामंडळ तसेच शेती महामंडळात नोकरीच्या आमिषाने तीन तरुणांची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी लक्ष्मण शिवाजी आरे (रा. मार्केटयार्ड) आणि विनायक वीरप्पा पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आरे आणि पुजारी यांच्याशी तक्रारदार तरुणाची ओळख झाली होती. तरुण तसेच त्याच्या मामाला वखार महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. तरुणाकडून आरोपींनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याच्याकडून दोन लाख ४५ हजार रुपये घेतले.

आरोपींनी आणखी एकास नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्याकडून चार लाख ५६ हजार रुपये आरोपींनी घेतले होते. तिघांकडून आरोपींनी सात लाख एक हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर त्यांना नोकरी मिळवून दिली नाही. त्यामुळे तक्रारदार तरुणाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.