पिंपरी : भांडण सोडविल्याच्या रागातून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना बोपखेल येथे घडली. विशाल शामे वाल्मीकी ( वय २६, रा. बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हे रविवारी दुपारी त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी विशाल यांना बाजूला नेऊन भांडण सोडविल्याच्या रागातून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विशाल यांच्या कानाला, डोक्यात आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

हॉटेल व्यावसायिकावर हल्ला

वाकड येथे एका हॉटेल व्यावसायिकावर दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाले आहेत. संभाजी त्रिंबक चव्हाण (वय ३४, रा. बाणेर) असे जखमी हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतिक अविनाश सरगर (वय २४), बासुराज शंकर हेळवे (वय ३०, दोघे रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. चव्हाण हे विनोदेवस्ती वाकड येथील एका हॉटेलमध्ये होळी खेळण्यासाठी गेले होते. तिथे एका कामगाराला आरोपी मारहाण करत होते. दरम्यान चव्हाण हे हॉटेलमधून बाहेर आले असता आरोपींनी चव्हाण यांना हॉटेलमधील कामगाराचा साथीदार समजून बेदम मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.