युवकाला गंडा ; ऑनलाइन दुचाकी दुरुस्ती महागात

वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील तपास करत आहेत.

पुणे :  ऑनलाइन दुचाकी दुरुस्ती सेवेची विचारणा करणाऱ्या एका युवकाला ११ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत आशय भुजबळ (वय १९, रा. घोरपडी) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशयला त्याच्या दुचाकीची दुरुस्ती करायची होती. दुचाकी देखभाल आणि दुरुस्ती सेवा देणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांची आशयने माहिती घेतली. ऑनलाइन पद्धतीने त्याने माहिती घेऊन एक दूरध्वनी क्रमांक मिळवला व त्यावर त्याने संपर्क साधला. त्यानंतर मोबाइलधारकाने त्याला एक लिंक पाठविली. या लिंकवर माहिती भरावी लागेल, असे त्याला सांगण्यात आले. या लिंकमध्ये आशयला त्याच्या आणि वडिलांच्या बँक खात्याबाबतची माहिती भरण्यास सांगण्यात आले.चोरटय़ाने केलेल्या बतावणीवर त्याने विश्वास ठेवला. त्याने वैयक्तिक माहिती असलेली लिंक चोरटय़ाच्या मोबाइल क्रमांकावर पाठविली. चोरटय़ाने गेल्या आठवडय़ात आशय आणि त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातून एकूण मिळून ११ हजार ६९९ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Youth cheated for online bike repair zws