पुणे : भरधाव टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगा प्रसाद (वय ३९ रा. आंबेगाव बुद्रूक) असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा प्रसाद एका ठिकाणी काम आटोपून रस्त्याने घरी जात होता. १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर तो रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या गंगा प्रसाद याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर जखमी गंगा प्रसादला मदत न करता टेम्पो चालक पसार झाला. त्याच्या शोधासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, वाहन क्रमांकानुसार लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.