पुणे : दुचाकी घसरून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातात सहप्रवासी जखमी झाला. तन्मय सचिन कळंत्रे (वय २१, रा. कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सहप्रवासी सेतू सुरेंद्र सुरकार (वय २०) जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणात सहायक फौजदार विजय डेंगळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तन्मय आणि सेतू शिवाजीनगर भागातील एका खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होते. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास दोघे एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात दुचाकीस्वार तन्मयचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. अपघातात दोघे जखमी झाले. तन्मयला गंभीर दुखापत झाली होती. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करत आहेत.