scorecardresearch

मराठी साहित्यविश्वात नव्या दमाची ऊर्जा; पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरणात तरुणांचा पुढाकार

वाचनाची आवड असलेल्या शरद अष्टेकर यांनी २०१० मध्ये पुस्तक वितरण, प्रदर्शन चंद्रपूरमध्ये सुरू केले.

youth initiative in marathi literature book
मराठी साहित्यविश्व (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

चिन्मय पाटणकर, लोकसत्ता

पुणे : गेल्या काही वर्षांत तरुणांनी मराठी पुस्तक व्यवसायाला नवा आयाम मिळवून दिला आहे. हे तरुण नव्या ऊर्जेने पुस्तक प्रकाशन, पुस्तक विक्रीमध्ये कार्यरत असून, नव्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यासह पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

साहित्य संमेलनांमध्ये होणाऱ्या पुस्तक विक्रीच्या आकडेवारीविषयी बोलले जाते. मराठी पुस्तकांना मागणी नाही, नवी पिढी वाचत नाही, वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात वाचनसंस्कृती कशी टिकवायची अशा विषयांवर चर्चा झडतात. या नकारात्मक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून काही तरुणांनी प्रकाशन, वितरण आणि विक्रीसाठी सातत्याने प्रयोग करून पुस्तक व्यवसायाला नवा आयाम मिळवून दिला आहे.  वाचनाची आवड असलेल्या शरद अष्टेकर यांनी २०१० मध्ये पुस्तक वितरण, प्रदर्शन चंद्रपूरमध्ये सुरू केले. जवळपास सात वर्षे त्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुस्तक विक्री केली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी ‘मंजुश्री पब्लिकेशन’च्या माध्यमातून पुस्तक प्रकाशनात पाऊल टाकले. ‘नव्याजुन्या लेखकांची पुस्तके, अनुवादित पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. काही वर्षांपूर्वी आव्हानात्मक असलेले पुस्तक प्रकाशन आता काहीसे सोपे झाले आहे. मराठी पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे अष्टेकर यांनी सांगितले. कल्याणचे भूषण कोलते वाचनाच्या प्रेमातून पुस्तकांकडे वळले. श्रीपाद चौधरी आणि ऋषिकेश नेटके या दोन मित्रांसह ते ‘पपायरस’ हे पुस्तकाचे दुकान आणि प्रकाशन संस्थाही चालवतात.

पुस्तकाचे दुकान आणि प्रकाशन संस्था सुरू करण्याविषयी भूषण म्हणाले, ‘महाविद्यालयात असताना पुस्तकांचे वाचन वाढले. मात्र कल्याणमध्ये पुस्तकांचे दुकान नसल्याने खरेदीसाठी ठाणे, दादर गाठावे लागत होते. वाचक मित्रांशी झालेल्या चर्चेतून पुस्तकांचे प्रदर्शन सुरू करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार २०१० मध्ये पुस्तक प्रदर्शन सुरू झाले. त्यानंतरच्या नोकरी करतानाही प्रदर्शने सुरूच होती. त्यातूनच ‘पपायरस’ उदयास आले. लेखकांशी संपर्क वाढत गेल्यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायातही उतरलो. नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केली.’  मूळचे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असलेल्या शरद तांदळे यांच्या ‘रावण’ आणि ‘आंत्रप्रुनर’ या पुस्तकांच्या हजारो प्रति विकल्या गेल्या आहेत. सजग वाचक ते प्रयोगशील प्रकाशक होण्याचा प्रवासही रंजक आहे. ‘माझे रावण हे पुस्तक प्रकाशित करण्यास कोणीच प्रकाशक तयार होत नव्हते. त्यामुळे प्रकाशन व्यवसाय आहे तरी काय हे समजून घेतले.

स्वत:चे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी न्यू इरा पब्लिकेशन हाऊस ही प्रकाशन संस्था सुरू केली. रावण पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने प्रकाशन सुरू ठेवले. आतापर्यंत ३४ हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. येत्या काळात शंभर नव्या लेखकांची पुस्तके प्रकाशित करायचे लक्ष्य आहे. त्याशिवाय पुस्तके ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी वितरण व्यवस्था उभी करत आहे. मराठी पुस्तकांचा इंग्रजी, हिंदीत अनुवाद प्रकाशित करत आहे,’ असे तांदळे यांनी सांगितले.  माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आशय आणि रुतिका वाळंबे या दाम्पत्याने टाळेबंदीच्या काळात सोसायटय़ांमध्ये पुस्तके पोहोचवण्यासाठी ‘पुस्तकवाले’ हा उपक्रम सुरू केला. गेल्या अडीच वर्षांत पुणे आणि परिसरात त्यांनी आठशे पुस्तक प्रदर्शने केली. ‘आमच्या ‘पुस्तकवाले’मध्ये आता ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेले तरुण कमवा आणि शिकाअंतर्गत कार्यरत झाले आहेत. पुस्तक प्रदर्शनासाठी या तरुणांना विपणन, संपर्क, संवाद आदींचे प्रशिक्षणही दिले जाते. तंत्रज्ञानाद्वारे वितरण व्यवस्था उभी केली आहे. त्यात आता ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट’ सुरू करत आहोत. त्याद्वारे अगदी सोप्या पद्धतीने पुस्तक मागवणे शक्य आहे.

ऐतिहासिक पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिद्धार्थ शेलार हा तरुण कार्यरत होता. टाळेबंदीच्या काळात ‘किताबवाला’ या नावाने पुस्तकांची विक्री सुरू केली. आता ‘किताबवाला’चे पुण्यात दालन सुरू झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी महिन्यातून दोन प्रदर्शने करत असल्याचे सिद्धार्थने सांगितले.

वाचक आहेत, पुस्तकांची गरज

मराठी पुस्तकांना वाचक आहेत, त्यांना नवा आशय हवा आहे, नवे साहित्य हवे आहे. केवळ वाचकांपर्यंत पुस्तके घेऊन जाणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा या तरुण प्रकाशक-वितरकांनी व्यक्त केली आहे. आजच्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून यावर सर्वानीच विचार करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 01:30 IST