पुणे : हडपसरमधील काळेपडळ परिसरातून एका तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्रसाद वीरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी किरण भैरू चव्हाण (वय ३२), रोहित भरत गायकवाड (वय १८, दोघे रा. संतोषी माता काॅलनी,ड्रीम आकृीत सोसायटीजवळ, काळेपडळ, हडपसर ) यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण आणि गायकवाड यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद देवज्ञे याचा मित्र राहुल राजेंद्र सुतार (वय २५, रा. संतोषीमाता काॅलनी, काळेपडळ, हडपसर) याने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘आरोपी किरण आणि प्रसाद यांच्या दोन महिन्यांपूर्वी वाद झाले होते. प्रसादने केलेल्या मारहाणीत किरण याच्या पायाला दुखापत झाली होती. मारहाण प्रकरणी प्रसाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रसाद काेल्हापूरला गेला होता. कोल्हापूरातून तो दोन ते तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन कामानिमित्त पुण्यात आला होता’, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.

मंगळवारी (३० डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपी किरण याने प्रसादला पाहिले. त्यानंतर त्याने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. काळेपडळ परिसरातील संतोषमाता काॅलनी परिसरात प्रसादला आरोपींनी बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी प्रसादला मोटारीतून संकेतविहार काॅलनी परिसरातील मोकळ्या मैदानावर नेले. आरोपींनी प्रसादच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

या घटनेची मााहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांंपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करत आहेत.