पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला वडगाव मावळ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बिसोवजित मोनीलाल देबनाथ (वय २१) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
१३ वर्षीय मुलीशी देबनाथची ओळख झाली होती. त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्या आईने तिला डाॅक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा देबनाथने वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे जुलै २०१९ मध्ये तक्रार दिली. या खटल्यात विशेष सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगले यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पीडित मुलीची आई, मुलगी हिच्यासह आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केले. आरोपीला सहानुभूती दाखविली जाऊ नये. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. चौगले यांनी केला. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे सादर केले. साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने देबनाथला शिक्षा सुनावली.
हेही वाचा – पुणे : वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
हेही वाचा – महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यातील तापमान कमी, असे का झाले?
तळेगाव पोलीस ठाण्यातील तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक डी. जे नागरगोजे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अविनाश गोरे यांनी न्याायलयीन कामकाजात सहाय केले.