दादा वासवानी हे भारतीय संत परंपरेतील आताच्या पिढीचे संत असून दादांचा विचार आज खूप महत्त्वाचा वाटतो, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ‘योग्य निर्णय घेण्यासाठी नेहमी शांत चित्ताने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण योग्य मार्ग निवडू शकतो, असे दादा नेहमी सांगतात. त्यामुळे तरुण पिढीने दादांकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले. आध्यात्मिक गुरु दादा जे. पी. वासवानी यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी दादा जे. पी. वासवानी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

‘दादांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यातील प्रेम, संतोष आणि विनम्रतेच्या वैश्विक शक्तीचा अनुभव येतो. आपल्याजवळचे जितके जास्त देता येईल, तितके इतरांना देत राहा. कायम इतरांना मदत करत राहणे गरजेचे आहे. दादांनी याच विचारांना प्रत्यक्षात आणून गरीब, पीडितांसाठी मदतीचा हात पुढे करुन त्यांचे आयुष्य सुखकर केले. त्यांनी दुसऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

यावेळी दादा वासवानी म्हणाले की, आज भारत देश अनेक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसामान्यांसाठी जनधन, स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजना आणल्या आहेत. या माध्यमातून देश पुढे जात आहे. यापुढे बोलताना दादा वासवानी यांनी ‘सत्य, प्रेम, सेवा, करुणा, बलिदान या मूल्यांचा भारतीयांनी अंगीकार केल्यास भारत हा जगातील सर्वश्रेष्ठ देश ठरेल,’ असे म्हणत त्यांचे मनोगत व्यक्त केले.