पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडाचा चुरा, अफू असे पाच लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी, कोंढवा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी काला याच्याकडे अफूच्या बाेंडाचा चुरा (पाॅपी स्ट्राॅ), अफू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्याची झडती घेण्यात आली. पिशवीत एक किलो ७२८ ग्रॅम अफूच्या बोंडाचा चुरा, तसेच ५८ मिलिग्रॅम अफू सापडली. काला याने अमली पदार्थ कोठून आणले, तसेच कोणाला विकणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी ही कारवाई केली.