लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तरुणाला विमान तिकीट काढून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलीम गोलेखान (वय २७, रा. मोहननगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. त्याला विमान तिकीट काढून देणारा ट्रॅव्हल कंपनीतील एजंट नसरुद्दीन खान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाच्या वतीने तुषार विश्वनाथ अंधारे (वय ३२, रा.धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आणखी वाचा-पुणे : नगर रस्ता परिसरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिलेसह दोघांचा मृत्यू, धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर सलीम गोलेखान याचे चिंचवडमध्ये बिर्याणी हाऊस आहे. त्याला वडिलांसह तातडीने लखनऊला जायचे होते. त्याने ट्रॅव्हल एजंट नसरुद्दीन खान याच्याकडून दोन तिकिटे काढली. इंडिगो एअर लाईनच्या विमानाने सलीम आणि त्याचे वडील लखनऊला जाणार होते. विमानतळात सलीम आणि त्याच्या वडिलांनी प्रवेश केला. सलीम आणि त्याच्या वडिलांच्या तिकिटावर असलेल्या क्रमांकाची (पीएनआर) क्रमाकांची खातरजमा करण्यात आली. तपसणीत सलीम याच्या तिकिटावर असलेला क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले. विमान तिकिटाच्या क्रमांकात फेरफार करून प्रवास करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी सलीमला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वडिलांच्या तिकिटावरील क्रमांक जुळल्यानंतर त्यांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला. आणखी वाचा- पुणे : लोहगावमधील आरआयटी महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभाग, अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सलीमकडे तिकिटाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा उत्तर प्रदेशातील एजंट नसरुद्दीन खान याने तिकीट काढून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सलीमविरुद्ध गु्न्हा दाखल करून त्याला अटक केली. एजंट नसरुद्दीन याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सलीमला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी दिली.