पिंपरी : आळंदी येथे गॅदरिंगचा कार्यक्रम पाहून घरी जाणाऱ्या तरुणांना अडवून किरकोळ कारणावरून मारहाण करत कटरने वार केले. ही घटना शुक्रवारी (३० जानेवारी) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडगाव रोडवर घडली.
या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र गॅदरिंगचा कार्यक्रम संपवून मित्राच्या घराकडे जात होते. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवून किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका मुलाने त्याच्याकडील कटरने फिर्यादी यांच्या मित्राच्या हातावर आणि मांडीवर वार केले, तसेच फिर्यादीच्या कमरेवर व खांद्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा
हिंजवडी फेज तीन परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (२८ जानेवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने आपल्या दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते. तो भरधाव वेगात आणि हयगयीने वाहन चालवत असताना त्याने फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला फॅक्चर झाले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीत गावठी दारू जप्त
हिंजवडी परिसरात अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (३१ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विक्रीच्या उद्देशाने सुमारे ६७ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जवळ बाळगली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या या मालाची किंमत ६ हजार १०० रुपये इतकी आहे. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १० जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवरील बर्गे वस्ती, कुरुळी फाटा येथे घडली.
मधुकर सिताराम खोचरे (३६, दत्तनगर, चिंबळीगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे नातेवाईक खोचरे हे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुणे बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

