बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने स्वतंत्र पॅनल उभे केले असून, या पॅनलच्या उभारणीत युगेंद्र पवार यांनी सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला आहे. पॅनलची रचना, इच्छुक उमेदवारांशी चर्चा आणि उमेदवारांची निवड या प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीच्या निमित्ताने युगेंद्र पवारांनी कारखाना कार्यक्षेत्रातील पक्षाच्या संघटनेला नव्याने बळ देण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने कारखान्याच्या सर्व २१ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधत पॅनलची बांधणी केली. उमेदवार निवडीपासून प्रचाराच्या नियोजनापर्यंतच्या प्रक्रियेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल रचना झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतेही पॅनलला ताकद देतील, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हेही प्रचारासाठी सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कारखान्याच्या राजकारणाची नव्याने मांडणी होत असताना युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. कारखान्याची निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाच्या संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वातून सुरू असल्याचे चित्र आहे.

पक्ष संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न

युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाच्या नव्या पिढीतील नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावांत कार्यकर्त्यांच्या बैठका, सभासदांशी संवाद आणि प्रचाराचे नियोजन सुरू असून, स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

शरद पवार यांच्या विचारांशी जोडलेले कार्यकर्ते आणि तरुणांना एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका युगेंद्र पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पॅनलची लढत न राहता, कारखाना कार्यक्षेत्रात पक्षाची संघटनात्मक ताकद उभी करण्याची संधी म्हणूनही पाहिली जात आहे.