शिरूरजवळ साकारली झीरो एनर्जी शाळा

आता तीच शाळा ‘शून्य ऊर्जा शाळा’ (झीरो एनर्जी स्कूल) म्हणून विकसित झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या हातात टॅब्लेट संगणक देऊन शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने पाच वर्षांपूर्वी शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणला होता. आता तीच शाळा ‘शून्य ऊर्जा शाळा’ (झीरो एनर्जी स्कूल) म्हणून विकसित झाली आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्य़ूमन व्हॅल्युज, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बँक ऑफ न्यूयॉर्क, मेलॉन यांच्या मदतीमुळे वर्षभरापूर्वी बांधकाम सुरू झालेल्या या शाळेच्या आठ झीरो एनर्जी वर्गखोल्या तयार झाल्या आहेत. इंटरनॅशनल पिसा अभ्यासक्रम आणि खुल्या वातावरणातील शिक्षण या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच शाळा आहे. शाळेच्या या कामाची दखल घेऊन बँक ऑफ न्यूयॉर्कने ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून शाळेला आठ वर्गखोल्या बांधण्यासाठी अर्थसाहाय्य केले.

नव्या बांधकामातील पूर्णत काचेच्या २२ फूट रुंद, २२ फूट लांब आणि १४ फूट उंचीच्या आठ वर्गखोल्या पर्यावरणपूरक आहेत. पॉलिकाबरेनेट आणि टेनसाईल मेंब्रेन यांचे द्विस्तरीय छत, १५०० अंश सेल्सियस तापमानाला मजबुतीकरण केलेल्या टफन काचेच्या भिंती आहेत. चारही बाजूंनी पाच फुटांचे पन्हाळ छत प्रत्येक वर्गाला उभे केले आहेत. छताचा पहिला स्तर निरुपयोगी प्लॅस्टिकपासून बनवलेल्या टेन्साईल मेमरेनचा असल्याने प्रकाश स्वीकारणे आणि उष्णता परावर्तित करणे शक्य होते. त्याखालील स्तर हा पॉलिकार्बनचा असून, पॉलिकार्बनच्या रासायनिक संरचनेमुळे प्रकाशाचे विस्तारीकरण होऊन थंड, उबदार प्रकाश मिळतो.

सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत एका वर्गखोलीसाठी साडेसहा लाख रुपये खर्च गृहीत धरून बांधलेल्या इमारतीचे आयुष्य तीस वर्षांसाठी गृहीत धरले जाते. झीरो एनर्जी स्कूल बिल्डिंग प्रकारात इमारत खर्चामध्ये ३० टक्के बचत होते. तसेच इमारतीचे आयुष्य तिप्पट होते.

आज जगात मुक्त शिक्षण पद्धती स्वीकारली जात आहे. मात्र, आपल्याकडील शाळा आजही जुन्याच पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मुलांना शाळेचा, शिक्षणाचा कंटाळा येतो. शाळेतील वातावरण छान, मोकळे असल्यास मुलेही आनंदी असतात. आमच्या शाळेत तसेच मोकळे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांच्या आवडीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले.

दत्तात्रय वारे, मुख्याध्यापक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zero energy school shirur

ताज्या बातम्या