पुणे : शहरात एरंडवणा आणि मुंढवा परिसरात झिकाचे तीन रुग्ण आढळले आहेत. मुंढव्यातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) शुक्रवारी पाठविण्यात आले. याचबरोबर रुग्ण आढळलेल्या परिसरातील १०० घरांमध्ये धूरफवारणी करण्याचे पाऊल महापालिकेने उचलले आहे. एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. एरंडवणा परिसरातील ५ गर्भवती आणि ३ संशयित रुग्णांचे नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने एनआयव्हीला पाठविले होते. मुंढव्यात एका ४७ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला होता. खासगी प्रयोगशाळेतील तिचा तपासणी अहवाल झिका पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने तिचा रक्तनमुना तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविला. त्यानंतर तिच्या कुटुंबातील ३ सदस्य आणि तापाची लक्षणे असणारे ९ शेजारी अशा १२ जणांचे रक्तनमुनेही तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविले. आता आणखी तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले. हेही वाचा.प्रवाशांनो, आता व्हॉट्स ॲपवर करा तक्रार! बेशिस्त रिक्षा, कॅब, खासगी बसवर तातडीने कारवाई होणार झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. एरंडवणा आणि मुंढव्यात प्रत्येकी १०० घरांच्या आतमध्ये धूर फवारणी करण्यात आली आहे. कारण झिकाचे डास घरांच्या आतमध्येही आढळून येतात. याचबरोबर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची डासोत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली जात आहेत. तसेच, या प्रकरणी इमारत मालकांना नोटिसाही बजावल्या जात आहेत, असेही डॉ. दिघे यांनी स्पष्ट केले.