पुणे : पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी मक्याचे कणीस किंवा इतर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी तात्पुरते स्टॉल उभारण्यात येतात. ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर या छोट्या विक्रेत्यांना पुणे जिल्हा परिषदेने लहान स्टॉल दिले असून त्याला ‘अमृतरथ’ असे नाव देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्टॉलवर विक्रेत्यांना त्यांचा छोटा व्यवसाय करणे सहज शक्य होणार आहे. हे व्यावसायिक साधारणपणे उकडलेली अंडी, मॅगी आणि इतर वस्तू विकणारे खाद्य विक्री या स्टॉलच्या माध्यमातून करत आहेत. पर्यटनामुळे आणि आता छोट्या स्टॉलमुळे गावांतील स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. हे स्टॉल हलवता येण्याजोगे असल्याने, कायमस्वरूपी किंवा तात्पुरती बांधकामे करून जमिनीवर अतिक्रमण देखील होणार नाही. याशिवाय स्टॉलमुळे स्वच्छ वातावरणात अन्न तयार करण्यास मदत होणार आहे. स्टॉल आगीपासून सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ‘स्टॉलचे वजन कमी असल्याने एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे उपलब्ध बाजारपेठेनुसार ते जवळच्या ठिकाणी विक्रेते जाऊ शकतात. ऋतूनिहाय स्टॉलची जागा बदलणे शक्य होणार आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात इतर पॉईंटवर, तर पावसाळ्यात ते पर्यटनस्थळी किंवा धबधब्याजवळ घेऊन जाणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायतींना ही विक्रेत्यांची संख्या अधिकृत करता येणे शक्य होणार आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळण्यास मदत होईल. या लहान उद्योजकांना मुद्रा कर्ज मिळावे यासाठी पुणे जिल्हा परिषद बँकांसोबत काम करत आहे.’

कचऱ्याचे व्यवस्थित संकलन

पावसाळी पर्यटनास जाणाऱ्या पर्यटकांकडून खाद्य पदार्थांचा कचरा कुठेही टाकला जातो. याचा फटका पर्यावरणाला बसतो. अनेक ठिकाणी तर कचऱ्याचा खच साचलेला असतो. जिल्हा परिषदेकडून यंदा विक्रेत्यांना देण्यात आलेल्या स्टॉलमुळे घनकचरा व्यवस्थापनात मदत होणार आहे. कचऱ्याचे व्यवस्थित संकलन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असून, पर्यटकांनी पर्यावरणपूरक बनण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zilla parishad help small vendors tourist places tourism tourists stall pune print news ysh
First published on: 07-07-2022 at 17:21 IST