भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनासाठी ओळखले जाणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एका वृत्तपत्राचा हवाला देत आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे दारूच्या नशेत सभेत भाषण केल्याचा आरोप केला आहे. प्रशांत भूषण यांनी एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे कात्रण ट्विट करून लिहिले आहे, आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक आपल्याच प्रचार सभेत दारू पिऊन पोहोचले! पक्षाने दिल्लीमध्ये दारू दुकानांची संख्या वाढवली आहे. आणि इकडे पंजाबला नशामुक्त बनवण्याचे वचन देत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या सभांना होणारी गर्दी होत आहे. परंतु गतवर्षी त्यांनी संसदेचा व्हिडिओ बनवल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेले नाही. या प्रकरणामुळे मान यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबितही करण्यात आले होते. यापूर्वीही दारूच्या व्यसनामुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होत होती.
विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे भगवंत मान हे पंजाबच्या संगरूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. प्रशांत भूषण यांनी ट्विटमध्ये ज्या वृत्तपत्राचे कात्रण जोडले आहे. त्या वृत्तात भगवंत मान हे भाषणा दरम्यान वारंवार पडत असल्याचे त्यात म्हटले आहे. प्रशांत भूषण हेही आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आहेत. पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरील मतभेदामुळे त्यांनी व योगेंद्र यादव यांनी आपचा राजीनामा दिला होता.