शिरोमणी अकाली दलाला सत्तेवरून खाली खेचत पंजाबमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक यश संपादन केले. काँग्रेसने पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागांवर विजय मिळवला. पंजाब विधानसभेत बहुमतासाठी ५९ जागांची गरज होती. त्यामुळे आता पंजाबमध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे. देशपातळीवर सर्वत्रच पिछेहाट असलेल्या काँग्रेससाठी हे यश खूपच आशादायक ठरले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अपेक्षित यश मिळवता आले नाही. याठिकाणी काँग्रेस आणि आपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, काँग्रेसने सुरूवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. त्यामुळे आपला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या अकाली दल व भाजपला अपेक्षेप्रमाणे प्रस्थापितविरोधी लाटेचा (अँटी इन्कम्बन्सी) फटका बसला. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाजांप्रमाणे अकाली दल व भाजपचे पानिपत झाले नाही, हीच गोष्ट त्यांच्यादृष्टीने समाधानकारक ठरली. अकाली दल व भाजपला अनुक्रमे १५ आणि ३ जागांवर विजय मिळाला. तर लोक इन्साफ पार्टीला २ जागा मिळाल्या. मात्र, एकूणच निकाल पाहता काँग्रेसने पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले.  अकाली दलाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले असले तरी बादल कुटुंबियांचे गड असलेल्या लंबी, जलालाबाद आणि मजिठा हे तिन्ही मतदारसंघ राखण्यात अनुक्रमे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि बिक्रमजित सिंग माजिठिया यांना यश आले. याशिवाय, काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पतियाळा तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून सहजपणे विजय प्राप्त केला. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेले यश हा काँग्रेसचा पुनर्जन्म आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर सिद्धू यांनी व्यक्त केली. येथून पुढे काँग्रेसचा देशात पुन्हा विस्तार होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला पंजाबमधील पक्षाचा पराभव मान्य करत आम्ही या पराभवाचे आत्मपरीक्षण करु, असे सांगितले.

 

आतापर्यंत अकाली दल व काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या पंजाबात प्रथमच ‘आप’च्या सहभागामुळे यंदाची निवडणूक कधी नव्हे इतकी रंगतदार बनली होती. अरविंद केजरीवालांच्या रूपाने प्रथमच पंजाब निवडणुकीच्या केंद्रस्थानी एक बिगरशीख नेता आहे. सुरूवातीला ‘आप’ पंजाबमध्ये अमाप यश मिळवेल, अशी हवा होती. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांतील बदलत्या राजकीय हवेने जनमताचा लंबक काँग्रेसकडे झुकलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर या लढतीत काँग्रेसने निर्विवादपणे बाजी मारली. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी ११०० उमेदवार रिंगणात होते. तब्बल १.४ कोटी लोकांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. पंजाब विधानसभेत गेल्यावर्षी ५६ जागा जिंकत अकाली दल राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेसला ४६ आणि  नेहमी अकाली दलाच्या लहान भावाच्या भूमिकेत राहिलेल्या भाजपला फक्त १२ जागांवर यश मिळाले होते. मात्र, यंदा काँग्रेसने विरोधकांना कोणतीही संधी न देता ७३ जागांवर विजय प्राप्त केला.

निकालादरम्यानच्या ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे.

३.५५   पंजाबमधील पराभव स्विकारतो, आम्ही पराभवाचे आत्मपरीक्षण करू- अमित शहा
३.४२:
भाजपचा आजचा विजय देशाच्या राजकारणातील जातीयवाद, लांगुलचालन आणि घराणेशाही हद्दपार करणारा- अमित शहा
३.४१: नरेंद्र मोदी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात लोकप्रिय नेते- अमित शहा
३.४० 
भाजपचा विजय हा नरेंद्र मोदी आणि कार्यकर्तांचा विजय- अमित शहा
३.३० :
पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाच्या युतीला ३० टक्क्यांपेक्षा जास्त मते- अमित शहा
२.३०:
काँग्रेसला ६३, आम आदमी पक्षाला १९, अकाली दल व भाजप युतीचा १७ जागांवर विजय 
१.५१:
विधानसभेच्या ११७ जागांपैकी भाजप ३, आम आदमी पक्ष १७, अकाली दल १० आणि लोक इन्साफ पक्षाला दोन जागांवर विजय
१.५०:
विधानसभेच्या ११७ जागांपैकी ५१ जागांवर काँग्रेसचा विजय, २६ जागांवर आघाडी
१.४५:
काँग्रेसला ७५, ‘आप’ला २४ , अकाली दल १५ आणि भाजपला ३ जागा

१.३० : पंजाबमधील यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे अभिनंदन

१.०० आम्ही ६५ जागांची अपेक्षा करत होतो. मात्र, ७० पेक्षा जास्त जागा मिळाल्या- कॅ. अमरिंदर सिंग
१२.४५ :
पतियाळा शहर मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदर सिंग ५१ हजार मतांनी विजयी
१२.१८ : आनंदपूर साहिबमधून काँग्रेसचे कनवार पाल सिंग विजयी
१२.१५ : जालंधर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे सुशील कुमार विजयी

११.२० काँग्रेस ७०, आप २३, अकाली दल-भाजप २१ आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर
११.१०:
काँग्रेस ६६, आप २३, अकाली दल २१, भाजप ४ आणि अपक्षांना तीन जागांवर आघाडी
११.०५:
लंबीमध्ये प्रकाशसिंग बादल १० हजार मतांनी आघाडीवर
११.००: पंजाबमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल; कॅप्टन अमरिंदर सिंग यांना बर्थ डे गिफ्ट

१०.२१ जलालाबादमध्ये उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल दोन हजार मतांनी आघाडीवर; भगवंत मान तिसऱ्या स्थानावर
१०.२५
लंबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल तीन हजार मतांनी आघाडीवर
१०.२० 
माजिठा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर बिक्रमजित मजिठिया आघाडीवर 
१०.१५  
पंजाबमधील ताज्या कलांनुसार काँग्रेसला ६० जागांसह बहुमत… अकाली दल-भाजप आघाडी २९ जागांवर, तर आप २५ जागांवर पुढे…
१०.००
‘आप’चे प्रमुख उमेदवार पिछाडीवर; अकाली दलासोबत दुसऱ्या स्थानासाठी लढत

९.३० लंबी मतदारसंघात प्रकाश सिंग बादल ५४३४ मतांसह आघाडीवर; अमरिंदर सिंग यांना ४१८९ मते
९.१५
६१ जागांचे सुरुवातीचे कल हाती; काँग्रेस ३८, आप १६ आणि अकाली दल १० जागांवर आघाडीवर
९.१०
४७ जागांवरील सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर; काँग्रेस ३१, आप ११ आणि अकाली दलाला पाच जागांवर आघाडी
९.०५ पतियाळा मतदारसंघात कॅ. अमरिंदर सिंग यांना ३५०० मतांची आघाडी
९.०१
विधानसभेच्या सुरूवातीच्या ३८ जागांचे कल हाती, काँग्रेस २४, आप ८ आणि अकाली दल+भाजपला ५ जागांवर आघाडी
९.००
काँग्रेस आणि आपमध्ये काँटे की टक्कर
८.५५
मला बादल कुटुंबियांना हारताना बघायचेय, जलालबाद मतदारसंघातील आपचे उमेदवार भगवंत मान यांची प्रतिक्रिया
८.४०
पंजाबमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी; २३ जागांपैकी १५ जागांवर आघाडी; अकाली दल ३, आपची ७ जागांवर आघाडी

८.३५ लंबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल आघाडीवर, कॅ. अमरिंदर सिंग दुसऱ्या आणि आपचे जर्नेलसिंग तिसऱ्या स्थानावर
८.३५
अकाली दलाचे खासदार सुखदेव सिंग धिंडसा यांच्याकडून त्रिशंकू परिस्थितीचे भाकित
८.३०
पंजाबमध्ये सुरूवातीचे कल हाती; पाचपैकी प्रत्येकी दोन जागांवर काँग्रेस आणि आप आघाडीवर, अकाली दलाला एका जागेवर आघाडी
८.२५
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांवर नजर


८.२२
कॅ. अमरिंदर सिंग यांचा आज वाढदिवस. चंदीगढ येथील निवासस्थानाहून घेत आहेत निवडणूकीचा आढावा.
८.१२
मतमोजणी केंद्रावर पोलीस तैनात

mohali

८.१० पंजाबमध्ये काँग्रेस किंवा ‘आप’ला एकहाती सत्ता मिळण्याचा अंदाज
८.०० मतमोजणीला सुरुवात. लवकरच राज्यातून निकाल मिळण्यास होणार सुरुवात
७.५६  अरविंद केजरीवालांच्या रूपाने प्रथमच पंजाब निवडणुकीच्या एक बिगरशीख नेता केंद्रस्थानी
७.५५
मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजानुसार पंजाबमध्ये काँग्रेस व आपमध्ये जोरदार लढत होण्याची चिन्हे
७.५३
अमृतसर पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रतिष्ठा पणाला
७.५२
मजिठा मतदारसंघात ब्रिकमजित मजिठिया यांचे अस्तित्त्व पणाला
७.५० 
जलालबादमध्ये उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांची प्रतिष्ठा पणाला; आपचे खासदार भगवंत मान आणि काँग्रेसच्या रवनितसिंग बिट्टू यांचे आव्हान
७.४७
लंबीत पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल , आम आदमी पक्षाचे जर्नेलसिंग आणि काँग्रेसचे कॅ. अमरिंदरसिंग यांच्यात लढत
७.४५
पंजाब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ५९ जागांची गरज 
७.३३ 
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षामध्ये चुरस
७.३२
बादल कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला
७.३०
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याचवेळात सुरु