पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला असून १६ मार्च रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे.  काँग्रेसने पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे अमरिंदर सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

पंजाबच्या विकासासाठी सर्व काही मदत केंद्र शासनाकडून मिळेल असे आश्वासन आपल्याला पंतप्रधानांनी दिले असल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले. आपण पंतप्रधानांचे आभार मानले असल्याचेही ते म्हणाले. तसेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील फोन करुन आपणास शुभेच्छा दिल्या असे ते म्हणाले. राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत असे अमरिंदर सिंग म्हणाले.

ड्रग्जविरोधात आपण कठोर भूमिका घेणार असल्याचे आश्वासन अमरिंदर सिंग यांनी प्रचारावेळी दिले होते. त्याला अनुसरुनच त्यांनी आपण पावले उचलणार आहोत असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन स्तरावर प्राधान्याने काम करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रावर अधिक भर दिला जाईल असे ते म्हणाले.

तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मनोविकार तज्ज्ञांची आवश्यकता आहे त्यांनी म्हटले. सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर सूडाचे राजकारण केले जाणार नाही असे ते म्हणाले. पंजाबच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने राजकारण केले जाईल असे ते म्हणाले. पंजाबच्या राजकारणात आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावूनत असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याबदद्ल अमरिंदर सिंग यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. पंजाबच्या विकासासाठी आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करू असे ते म्हणाले. जनतेनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून लोकशाहीच्या सबळीकरणासाठी आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले. ११ मार्च रोजी अमरिंदर सिंग यांचा ७५ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी काँग्रेसने ७७ जागा जिंकून एक विक्रमच केला आहे. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकहाती सत्ता मिळवलेला पंजाब हे पहिलेच राज्य आहे. या यशाचे श्रेय अमरिंदर सिंग यांनाच देण्यात आले आहे.