पाकिस्तान पंजाबच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करण्याच्या प्रयत्नात असतो असा आरोप करत सीमारेषेवरील राज्य असल्याने पंजाबमध्ये सक्षम, मजबूत आणि सुरक्षित सरकार हवे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने पंजाबमधील तरुणांची दहशतवादी आणि व्यसनाधीन अशी प्रतिमा निर्माण केली असा आरोपही त्यांनी केला आहे.

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंजाबमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला. फरिदकोट आणि लुधियानामध्ये मोदींनी सभा घेत काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलची युती असून अंमली पदार्थाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने पंजाबमधील भाजप – अकाली दल युतीवर टीकेची झोड उठवली आहे. लुधियानामधील सभेत मोदींनी याच मुद्यावरुन काँग्रेसचा समाचार घेतला. व्यसनाधीन ठरवून पंजाबी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करु नका असे त्यांनी सांगितले. पंजाबपाठोपाठ काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना पंजाब सरकारच्या कामात अडथळे आणण्याचे काम त्यांनी केले. पण आम्ही सत्तेवर येताच आता पंजाबमधील सरकारला सहकार्य केले आणि आता त्याचे परिणामही दिसू लागलेत असे मोदींनी नमूद केले.  शेतक-यांची परिस्थीती सुधारावी यासाठी आम्ही विविध योजना आणल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाही आम्ही आणल्या आहेत असे सांगत त्यांनी शेतक-यांसाठी राबवलेल्या योजनांचा पाढाच वाचला

लुधियानापूर्वी नरेंद्र मोदी यांनी फरिदकोटमध्ये सभा घेतली. या सभेत मोदींनी काँग्रेस आणि आपवर टीकास्त्र सोडले. पंजाबमध्ये सत्तानिवडीवरुन देशाचे भाग्यही ठरवले जाते असे मोदींनी सांगितले. ज्या लोकांनी अण्णा हजारेंना न्याय दिला नाही, ती लोक बादल यांच्यासोबत कसे न्याय करतील असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. गुरु ग्रंथ साहिब यांच्या ग्रंथाचा अवमान केला त्यांना कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्या असे आवाहन त्यांनी केले. एका पक्षाचे नेते पंजाबमधील तरुणाईला व्यसनाधीन ठरवण्याचा काम करत असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. जी लोक दिल्लीमार्गे पंजाबमध्ये आले आहेत. त्यांना आधी दिल्लीच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करायला सांगा असे टोलाही त्यांनी अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. प्रकाशसिंह बादल हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असून हे निषेधार्ह आहे असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी राज्याच अंमली पदार्थ नसल्याचा दावा केला. आमच्या राज्यात अंमली पदार्थच नाही, आमच्याकडे अंमली पदार्थ तयार होत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Live Updates
14:54 (IST) 29 Jan 2017
काँग्रेसने पंजाब सरकारच्या विकासकामात अडथळे आणले - मोदी
14:50 (IST) 29 Jan 2017
व्यसनाधीन ठरवून पंजाबी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करु नका - मोदी
14:49 (IST) 29 Jan 2017
काँग्रेसने पंजाबी लोकांची दहशतवादी म्हणून प्रतिमा निर्माण केली - मोदी
14:45 (IST) 29 Jan 2017
लोकशाहीची गळचेपी नको, लोकशाहीचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याची गरज - मोदी
14:44 (IST) 29 Jan 2017
गुरु ग्रंथ साहिब यांचा अवमान करणा-यांना शिक्षा झाली पाहिजे - मोदी
14:43 (IST) 29 Jan 2017
काही लोकांनी शीला दीक्षित यांनाही तुरुंगात टाकण्याची गर्जना केली होती - मोदी
14:43 (IST) 29 Jan 2017
देशाने आम्हाला सत्ता दिली ते तुरुंगात टाकण्यासाठी नव्हे तर कायद्याचे पालन करण्यासाठी दिली - मोदी
14:41 (IST) 29 Jan 2017
प्रकाशसिग बादल आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते टीकेचा स्तर खाली आणत नाही - मोदी
14:39 (IST) 29 Jan 2017
सीमारेषेवर राज्य असल्याने पंजाबमध्ये स्थिर आणि सक्षम सरकार असणे गरजेचे - मोदी
14:39 (IST) 29 Jan 2017
पाकिस्तान पंजाबच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करतो - मोदी
14:38 (IST) 29 Jan 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लुधियानामधील सभेला सुरुवात.