पंजाबमध्ये आज ११७ जागांसाठी मतदान; तिरंगी लढतीमुळे उत्सुकता

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) सहभागाने विलक्षण उत्कंठा निर्माण केलेल्या पंजाबमध्ये आज (शनिवार) ११७ जागांसाठी मतदान होत आहे. अकाली दल- भाजपकडून सत्ता हुसकावून घेण्यामध्ये ‘आप’ की काँग्रेस बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असेल.

माळवा, माझ्झा आणि दोअबा असे पंजाबचे तीन विभाग पडतात. त्यापैकी संगरूर, मनसा, फतेहगड साहिब, फरीदकोट, फजिल्का आदी जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या माळवा प्रांतामध्ये ‘आप’चा जोर दिसतो आहे. सतलज व बियास नदीदरम्यानचा सुपीक प्रदेश असलेल्या दोअबामध्ये (जालंधर, लुधियाना, होशियारपूर, कपूरथळा) ‘आप’ आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढाई असल्याचे चित्र आहे. तर पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या तरणतारण, फिरोजपूर, अमृतसर, गुरुदासपूर, पठाणकोट आदी जिल्ह्य़ांच्या माझ्झा विभागांमध्ये ‘आप’ला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

बदलांचे वारे घुमत असताना दलितांची मते ‘आप’कडे वळत असल्याचा अंदाज आहे. पंजाबात दलितांची तब्बल ३४ टक्के मते आहेत आणि देशातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. तसेच डेरा सच्चा सौदाने अकाली- भाजपला उघड पाठिंबा दिलाय.  पंजाबमधील मतमोजणी उर्वरित चार राज्यांप्रमाणे ११ मार्च रोजी आहे.

लक्षवेधी लढती

  • लंबी : जर्नेलसिंग जर ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे ‘डार्क हॉर्स’ उमेदवार असतील तर मुक्तसर जिल्ह्य़ातील या मतदारसंघात तीन भावी मुख्यमंत्र्यांची (प्रकाशसिंग बादल, कॅ. अमरिंदरसिंग आणि जर्नेलसिंग) लढत आहे. बादलांच्या या बालेकिल्ल्यात ‘बादल नही, बदलाव’च्या घोषणा धडका देत आहेत..
  • जलालाबाद : उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांना या मतदारसंघात तीन खासदारांशी मुकाबला करावा लागतोय. आपचे भगवंत मान, काँग्रेसचे रवनीतसिंग बिट्टू आणि स्वपक्षीय बंडखोर खासदार शेरसिंग गुबाया हे तीन खासदार. गुबायांचा चिरंजीव काँग्रेस तिकिटावर शेजारच्या मतदारसंघात उभा आहे.
  • पतियाळा : काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कॅ. अमरिंदरसिंग यांचा हा परंपरागत मतदारसंघ. त्यांच्याविरुद्ध अकाली दलाने माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांना उभे केलेय.
  • मजिठा : पंजाबमधील व्यसनाधीनतेसाठी जबाबदार धरल्या गेलेले बिक्रमजित मजिठिया यांना ‘आप’ व काँग्रेसकडून मोठे आव्हान मिळाले आहे. बिक्रमजित हे केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे धाकटे बंधू आहेत.
  • अमृतसर पूर्व : शेवटच्या क्षणी काँग्रेसमध्ये गेलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना भाजपचे राजेशकुमार हनी आणि ‘आप’च्या सरबज्योतसिंग यांच्याशी सामना करावा लागतोय. आतापर्यंत भाजपकडून उभे राहणाऱ्या सिद्धूंच्या लोकप्रियतेचा कस लागण्याची चिन्हे आहेत.

प्रचाराची वैशिष्टय़े

  • अमली पदार्थाचा विळखा या संवेदनशील सामाजिक विषयाभोवती पंजाबचा प्रचार केंद्रित झाला आहे. युवकांची पिढी बादल कुटुंबीयांनी बरबाद केल्याचा दावा आप व काँग्रेसचा आहे, तर पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अकाली- भाजपचा आहे.
  • सलग दहा वर्षे असलेल्या सत्तेमुळे अकाली दलाविरुद्धचे जनमत तीव्र. त्यात बादलांची एकाधिकारशाही, त्यांच्या कार्यकर्त्यांवरील गुंडगिरीचे आरोप आदींना जनता कंटाळल्याचे चित्र आहे.
  • अरविंद केजरीवालांची वैशिष्टय़पूर्ण प्रचारमोहीम हे या निवडणुकीचे वेगळेपण म्हणता येईल. पण त्याचबरोबर फुटीरतावादी गटांशी त्यांनी बांधलेल्या संधानामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

untitled-16