पंजाबमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत अमली पदार्थाबरोबरच भ्रष्टाचार हा मुद्दा उठवण्यात आला आहे. आम आदमी पक्षाची (आप) जबाबदारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दल-भाजप सरकारविरोधात दिलेल्या सर्व भाषणांत या दोन्ही मुद्द्यांवर भर दिला आहे. आपने एक टीम तयार केली आहे. ही टीम गत दोन वर्षांपासून पंजाबमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची एक गोपनीय यादी तयार करत होती. या यादीत काही राजकीय नेत्यांचीही नावे आहेत. जर आप सरकार सत्तेवर आले तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते.

या टीमचे नेतृत्व हिमतसिंग शेरगिल करत असल्याची माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. हिमतसिंग शेरगिल हे आपचे कायदा विभागाचे प्रमुख आहेत. ते पंजाबचे विद्यमान महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्याविरोधात मजिठा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. शेरगिल यांनी कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून ही यादी बनवली आहे. जर आपचे सरकार सत्तेवर आले तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ही यादी तयार करणाऱ्या टीममधील एका सदस्याने दिली. राजकीय नेत्यांना राज्य लुटण्यास मदत करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांमुळे पंजाबचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत. विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांबाबत त्यांचे नकारात्मक मत आहे.
शेरगिल यांनीही अशा प्रकारची यादी तयार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. पंजाबमध्ये काही राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत. भ्रष्टाचारामुळे क्रमांक एकवर असलेले पंजाब हे राज्य आज तळास पोहोचला आहे. इतकंच नव्हे तर पैशाच्या लालसेपोटी या लोकांनी पंजाबच्या युवकांना अमली पदार्थाच्या व्यसनी बनवले आहे. बनावट कीटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्या यादीत भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्यांची नावे आहेत. यामध्ये सर्व पुरावेही असल्याचे शेरगिल यांनी सांगितले.