आम आदमी पक्षाचे पंजाबमधील संगरूरचे उपद्रवी खासदार भगवंत मान हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ या गटात मोडतात. खरे तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचेय, पण त्यांच्या उद्योगी स्वभावामुळे अरविंद केजरीवाल तयार नाहीत. पण लोकप्रियतेमुळे त्यांना प्रचारप्रमुख म्हणून नेमावे लागलंय. उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्याविरुद्ध जलालाबादमधून लढणाऱ्या मान यांच्या सभांना मोठी मागणी असते. पण शनिवारी सायंकाळी घात झाला! थेट संसदेत मद्य पिऊन येण्याचा आरोप असलेले मान भटिंडाजवळील सभेतही तशाच अवस्थेत आले होते. गर्दीकडे पाहून ते असे हावभाव करपत होते, की बोलायची सोय नाही. चित्र-विचित्र हातवारे चालू होते. धड बोलता येत नव्हते. नंतर तर तोल जाऊन व्यासपीठावरच पडले ते दोनदा. शेवटी अब्रूचे आणखी धिंडवडे निघण्यापूर्वी त्यांना उचलून गाडीत टाकले. मान यांच्या उद्योगाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अकाली दलाला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. अमली पदार्थावरून अकाल्यांना लक्ष्य करणाऱ्या केजरीवालांचा माणूसच अशा अवस्थेत रंगे हात मिळणे म्हणजे लॉटरीच. असे सांगतात, की मान एक ना एक दिवस अडचणीत आणण्याचा इशारा केजरीवालांना दिला गेला होता. पण आदमी थक जाता है.. असे सांगून केजरीवालांनी शंका बाजूला सारली होती. आता ऐन रणधुमाळीत पंजाबला नशामुक्त करण्याची राणा भीमदेवी गर्जना केजरीवाल कोणत्या तोंडाने करणार? तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची अशी वेळ केजरीवालांवर क्वचितच आली असेल..