दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवालांनी नुकतीच पटकथा लिहून हातावेगळी केलीय. त्यांच्या ‘कलाकृती’चा ‘नायक’ अजून निश्चित नाही. अन्य कलाकारसुद्धा नक्की नाहीत. पण अपवाद फक्त खलनायकाचा! हे पात्र केजरीवालांनी केव्हापासूनच पक्के उभे करून ठेवलंय..

बिक्रमजित मजिठिया हे त्या खलनायकाचे नाव. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सुनेचा भाऊ, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचा मेहुणा आणि केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचा धाकटा भाऊ आणि पंजाबमधील चार-पाच खाती सांभाळणारा प्रभावशाली मंत्री. वय फक्त चाळीस. याशिवाय अकाली दलाच्या युवक आघाडीचा सर्वेसर्वा. पण बिक्रमजित मजिठियांची ही शक्तिशाली पाश्र्वभूमी पुसून केजरीवालांनी त्यांना खलनायकाच्या िपजऱ्यातच उभे केलेय. ‘मजिठिया.. द इंटरनॅशनल ड्रग माफिया’. पंजाबला विळखा घातलेल्या अमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय तस्कर! पंजाबचा पिढी बरबाद करणारा खलनायक!!

‘‘११ मार्चला आप सत्तेवर येईल आणि १५ एप्रिलच्या आत या माजलेल्या मजिठियाला तुरुंगात टाकलेले असेल. जनता दहशतमुक्त झालीय. ती तुमची कॉलर पकडून फरफटत नेईल आणि तुरुंगात डांबेल..’’ केजरीवालांची ही आव्हानात्मक गर्जना असते ती थेट मजिठियांच्या बालेकिल्ल्यात. मजिठय़ात. अमृतसरपासून अर्धा तासाच्या अंतरावर असलेले छोटे टुमदार टिपिकल पंजाबी गाव. आणि हो, मजिठियांवरील हल्लाबोल फक्त मजिठामधील सभेपुरताच नसतो. जिथे जिथे जातात, तिथे तिथे मजिठिया हेच त्यांची मुख्य शिकार असते. नव्वदीतील वयोवृद्ध मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याविरुद्ध फार आक्रमक बोलता येत नाही, उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्याविरुद्ध सनसनाटी बोलण्यासारखे काही नाही. महिला असल्याने हरसिमरत कौर यांच्याविरुद्ध बोलण्यासही मर्यादा पडते.. मग ‘सॉफ्ट टाग्रेट’ बिक्रमजित मजिठिया. गेली दहा वष्रे पंजाब चालविणाऱ्या बादल कुटुंबाच्या चौकडीमधील सर्वात दुबळी कडी. मुळात मजिठियांची प्रतिमा ‘बिगडी हुई औलाद’सारखी आणि त्यात अमली पदार्थाच्या तस्करीचा आरोप. त्यामुळे प्रहार करणे तुलनेने सोपे. केजरीवालांनी नेमके तेच केलेय.

आरोपातील खरेखोटेपणा सिद्ध व्हायचाय; पण केजरीवालांनी मजिठियांना प्रतिमेचे कैदी करून टाकलेय. व्यसने आणि अमली पदार्थाचा विळखा हा पंजाबमधील सर्वाधिक ज्वलंत सामाजिक प्रश्न. त्याने गंभीर राजकीय रूप धारण केलेय. किंबहुना पंजाबची निवडणूक व्यसनाधीनतेभोवती गरागरा फिरू लागलीय. व्यसनविळख्याचे तीव्र चित्र मांडायचे आणि त्यासाठी थेट मजिठियांना (व्हाया बादल) जबाबदार धरायचे. म्हणजे केजरीवाल एकाच बाणात दोन पक्षी टिपत आहेत. स्वतच्या संशयास्पद उद्योगांनी मजिठियांनी ते कोलित दिलंय. अगदी मोदी सरकारने त्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली होती. तस्कर टोळीच्या एका म्होरक्याने तर पोलिसांना दिलेल्या लेखी जबानीमध्ये मजिठियांना ३५ लाख रुपये दिल्याचे कबूल केलेय. पुढे काही झाले नाही, हा भाग अलाहिदा. पण केजरीवालांनी हा मुद्दा एवढा बेमालूमपणे पळविला की तो आता पंजाब जिंकण्याचा ‘पासवर्ड’ वाटू लागलाय.

भुरूभुरू पाऊस ठिपकत होता. तशातच मजिठामधील ‘आप’ कार्यालयात कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन केले. थोडी पांगापांग झाल्यावर चक्क मराठी शब्द कानावर पडल्याने चमकलो. चौकशीअंती समजले, की मुंबईहून ‘आप’ कार्यकर्त्यांचा एक जथ्था िहमतसिंग शेरगिल यांच्या प्रचारासाठी मजिठय़ात तळ देऊन आहे. त्यांचे प्रमुख होते सतीश जैन. मुंबईचे निमंत्रक. जैन यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा लढविली होती. त्यांच्यासोबत कुमुद मिश्रा, काíतक नायकर, खान बादशहा असे काही मुंबईकर कार्यकत्रे एका गाडीतून कथुनांगल या गावात पोचले. प्रत्येक दुकानात जाऊन केजरीवालांचे हमीपत्रक द्यायचे आणि ‘झाडू को व्होट दो. पंजाब को क्लीन करने की आवश्यकता है..’, अशी विनंती करायची. चौकापासून जरा दूर असलेल्या एका घरावर अकाली दलाचा झेंडा असल्याने ही मंडळी जरा बिचकतच तिथे गेली; पण घरातील महिला बिनधास्त म्हणाली, ‘झेंडा सरपंचांनी लावलाय. नाही म्हणता येत नाही. पण यंदा मत झाडूलाच आहे..’ एव्हाना गावात पत्रके वाटून झाली होती. मग पुढचे गाव. दिवसाला तीन-चार गावांमध्ये पोचण्याचा प्रयत्न असतो. मजिठिया- बादलांच्या दहशतीचे भूत मानगुटीवरून उतरले, की चमत्कार झालाच म्हणून समजा, असे जैन यांचे म्हणणे आहे.

त्यांचा रामराम घेतला आणि अकाली दलाचे कार्यालय गाठले. घोळक्यामध्ये गेलो आणि केजरीवालांचे नुसते नाव काढताच त्यांच्यापकी राजेश कुमार भडकलेच. ‘‘ओ तो झूठ की मशीन है. स्वत नक्षलवादी आहेत आणि बिक्रमजीवर तस्करीचे आरोप करताहेत. हमारे बिक्रमजी तो सूरमा है, (उनकी) बहन हरसिमरत कौर जी झाँशी की रानी है. उनके पिता देश के संरक्षण उपमंत्री थे. सब खानदानी लोग है.. खानदानी माणसे अमली पदार्थाचा धंदा करतील का?’’ पण हेच राजेश कुमार निरोप देण्यासाठी बाहेर आल्यावर हळूच म्हणाले, ‘‘दहा वर्षांचे सरकार आहे. नाराजी तर असणारच.’’ केजरीवालांना ते सातत्याने देत असलेल्या शिव्याशापांचा अर्थच असा होता, की केजरीवालांनी बिलकुल सही पकडा है..   आपल्या लहान भावाला घेरल्याने बहीण, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर चवताळल्याचे दिसतेय. ‘‘पंजाबात केजरीवालांना आम्ही आत टाकू आणि अरुण जेटलीजी त्यांना दिल्लीत आत घालतील,’’ असे त्या जाहीरपणे सांगतात. त्यांचा इशारा केजरीवालांनी जेटलींवर दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या आरोपांकडे होता. जेटलींनी केजरीवालांना न्यायालयात खेचलेय. मजिठियांनीसुद्धा तसेच केलेय. पण खलनायकाचा शिक्का बसत असतानाही स्वत: मजिठिया वरकरणी शांत आहेत. घोंघावणाऱ्या वादळाची कदाचित त्यांना जाणीव झाली असावी.