राज्यांचा ‘पंच’नामा पंजाब

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नुकतेच पंजाबात होते. राहुलची सभा होती अमृतसरजवळील मजिठय़ात, जिथे ‘अमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय तस्कर’ असा शिक्का लागलेले अकाली दलाचे शक्तिशाली नेते ब्रिकमजित मजिठिया लढत आहेत. राहुल म्हणाले, ‘‘पंजाबमधील सत्तर टक्के युवक व्यसनाधीन असल्याचे मी वर्षभरापूर्वी सांगितले होते. पण तेव्हा मला वेडय़ात काढले. पंजाबच्या पिढय़ा बरबाद करणाऱ्यांविरुद्ध असा कडक कायदा करू की त्यांचे हात थरथर कापतील..’’

तिथूनच सुमारे दीड-दोन तासांच्या अंतरावर असलेल्या जालंधरमध्ये दुपारी मोदींची सभा होती. शेजारी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल होते. पंजाबची अगोदर दहशतवादावरून बदनामी केली आणि आता अमली पदार्थावरून चालू असल्याचे बादलांचे ठाम म्हणणे. त्यांचीच री गिरवीत मोदी म्हणाले, ‘‘पंजाबच्या युवकांना बदनाम करण्याचा कट आहे. पाकमधून येणाऱ्या अमली पदार्थाशी पंजाब धैर्याने लढत असताना काही लोक बदनामी करीत आहे. स्वत:च्या राजकारणासाठी पंजाबला का बदनाम करताय?’’

‘बरबादी’ की ‘बदनामी’? गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पंजाबमधील व्यसनाधिनतेची अक्राळविक्राळ समस्या एकदमच पृष्ठभागावर आली आहे. ‘उडता पंजाब’ने तर अंगावर शहारे आणले होते. ही समस्या मूलत: सामाजिक आणि आर्थिक. पण या समस्येने आता राजकीय रंग धारण केलाय. निवडणुकीतील तो सर्वात संवेदनशील मुद्दा बनलाय आणि त्यासाठी बादलच जबाबदार असल्याचे चित्र बऱ्यापैकी रुजले आहे.

पण राहुल-केजरीवाल म्हणतात तशी पिढी ‘बरबाद’ झाली की बादल-मोदी म्हणतात त्याप्रमाणे पंजाबची ‘बदनामी’ चालू आहे? वर्षभरापूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि पंजाबच्या आरोग्य खात्याने प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) मदतीने विस्तृत अहवाल तयार केला आहे. त्यानुसार अमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेले ७६ टक्के १८ ते ३५ वयोगटांतील आहेत. ८५ टक्के गरीब, निम्न मध्यमवर्गीय आहेत. सर्वाधिक वापर हेरॉइनचा (५३ टक्के), त्यानंतर अफूचा (३३ टक्के) आणि एकूण धंदा किमान दरवर्षी साडेसात हजार कोटींचा. अहवालात पुढे म्हटलेय की, पंजाबमधील २,३२,८५६ जण ‘ड्रगिस्ट’ असावेत. म्हणजे पूर्णपणे आहारी (ड्रग डिपेंडंट) गेलेले आणि आहारी न गेलेले; पण नियमित सेवन करणाऱ्यांची संख्या साडेआठ लाख असावी. म्हणजे अडीच कोटींच्या पंजाबात ‘फक्त’ २,३२,८५६ ‘ड्रगिस्ट’ आणि साडेआठ लाख ‘यूझर्स’. म्हणजे ‘नॉर्मल’ प्रमाण! अन्य राज्यांइतकेच. मग जेवढी ‘बदनामी’ चालू आहे, तेवढी ‘बरबादी’ झाली नसल्याचा निष्कर्ष काढावा का?

[jwplayer SuEf42hL]

निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा सरकारी अहवाल बाजूला ठेवला आणि निघालो जालंधरमधील एका विद्यापीठाजवळ. तिथे अमली पदार्थ खुलेआम मिळत असल्याची माहिती एका विश्वासार्ह व्यक्तीने दिली होती. शोधले, नाही मिळाले. पण शोधयात्रेतून शहराला लागून असलेल्या गावात पोचलो. तिथे शिरतानाच लागलेल्या टपरीमध्ये होता देशी दारूचा गुत्ता. रांग लागलेली. ती कमी झाल्यावर ठेकेदार प्रवीणकुमार सैनीला भेटलो. पंचविशीतला प्रवीण मुलायमसिंहांच्या मैनपुरीचा. दिवसाची विक्री वीस ते पंचवीस हजारांची. त्याला खाऊन-पिऊन पाच हजार रुपये पगार. धंद्याला चांगलीच बरकत असल्याने आणि ‘एक्स्ट्रा’ पैसे मिळत असल्याने तो खूश होता. हवेबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘साहेब, मी बाहेरचा. माहिती नाही मला.’

‘अरे, आम्ही ऐकतोय की पंजाबमध्ये नशा खूप आहे. काय खरे?’

माहितीतील विषय काढल्यानंतर तो एकदम खुलला. ‘इथे घरटी एक तरी माणूस व्यसनाधीन आहे. आमच्याकडे (उत्तर प्रदेशात) बापाबरोबर नशा करण्याची हिंमत होत नाही. पण इथे पंजाबात बाप-मुलगा मिळून दारू पितात. धिंगाणा घालतात. घरातल्या बायाबापडय़ांना मारझोड

करतात. वैतागलीत ती. कधी कधी बघवत नाही. पण करू काय? पापी पेट का सवाल है..’

मी म्हटले, असे असेल तर मतदानावर परिणाम होणार. मान डोलावून तो म्हणाला, ‘हे ड्रगिस्ट आणि दारूडे कोणाला मत देतील सांगता येणार नाही; पण त्यांच्या घरातील सगळी माणसे हाताकडे किंवा झाडूकडे गेलेत.’ पण मजेचा भाग असा की त्याचा मालक खुद्द काँग्रेसचा आहे. पंजाबच्या दारूधंद्यात अकालींची एकाधिकारशाही असल्याचा समज आहे. पण हा गुत्ता अपवाद असावा.

प्रवीण बोलण्यात रंगल्याने रांग टपरीबाहेर गेली. भरदिवसा दारूसाठी बैचेन झालेले ते सारे जीव तडफडलेल्या नजरेने आमच्याकडे बघत होते. त्यातील एक जण पुढे आला. त्या गुत्त्यासमोरील रांगेतील ती व्यक्ती चक्क सरकारी डॉक्टर होती.

मी म्हटले, ‘आप डॉक्टर हो.. और यहाँ?’

तो विकट हास्य करीत म्हणाला, ‘करे तो क्या करे?’

राजकारण- व्यसनाधिनतेवर अधिकारवाणीने बोलणे झाल्यानंतर तो एकदम शायरीवर आला.

मयखाने में बैठकर कोन कितनी पी गया ये तो मयखाना ही जाने

मगर मयखाना कितने घरों को पी गया ये तो खुद मयखाना भी ना जाने..

टपरीमधील मयखान्यात जमलेल्यांनी त्या शायरीला दर्दी दाद दिली आणि मयखान्याने गटागटा प्यायलेल्या घरांची मोजदाद करण्याच्या भानगडीत न पडता तृषार्त नजरेने आपल्या नंबराची वाट पाहू लागली..

[jwplayer nhrjCcHt]