इतर पक्षांकडून मतांसाठी पैसे दिले जातील, ते घ्या; पण मते झाडूलाच द्या, असे विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील जालंधर येथे शुक्रवारी झालेल्या रोड शोदरम्यान केले आहे. त्यांच्या या ‘मनी पॉलिसी’मुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ४ फेब्रुवारीला मतदान होत आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून ‘रंग’ भरला आहे. जालंधर येथे त्यांनी विविध भागांत रोड शो केले. त्यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना नवीन वाद ओढवून घेतला आहे. चार फेब्रुवारीला मतदान होत आहे. सर्व पक्षांचे नेते तुम्हाला पैसे देण्यासाठी येतील. सर्वांकडून पैसे घ्या, पण मते मात्र झाडूलाच द्या, असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले. आमचे सरकार निवडून आल्यानंतर पंजाबमधून गेलेले उद्योगधंदे परत आणण्यात येतील. राज्यात उद्योगधंदे येतील, तिथे अधिकाधिक रोजगार स्थानिकांना देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कॅप्टन आणि बादल कुटुंबीयांमध्ये साटेलोटे आहे. आळीपाळीने सरकार स्थापन करून पंजाबला लुटण्याचे काम करत आहेत. या लुटीविरोधात तुम्ही मतदान करा आणि तुमचे नशीब बदला, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. तत्पूर्वी पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर बूटफेक आणि उपमुख्यमंत्री सुखबीर यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांशी आम आदमी पक्षाचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचा पक्ष या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करतो, पण हा लोकांचा रोष ओढवून घेतल्याचा परिणाम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.