उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज गुरूवारी जाहीर झाले. यामध्ये इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानुसार पंजाबमध्ये काँग्रेस ६२ ते ७१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवेल. तर पंजाबमधील नवीन सत्ताकेंद्र बनू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) ४२ ते ५१ जागा मिळतील. तर भाजप आणि अकाली दलाचे पंजाबमध्ये पूर्णपणे पानिपत होणार असल्याचा अंदाज इंडिया टुडेने वर्तविला आहे. अँटी-इन्कम्बसी फॅक्टरचा भाजप आणि अकाली दलाला या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला आहे. हे दोन्ही पक्ष मिळून केवळ ४ ते ७ जागाच जिंकू शकतात. असे अंदाज वर्तवण्यात आले होते.  याठिकाणी अकाली दलाला ४ ते ७ जागा मिळतील तर अपक्षांना दोन जागांवर यश मिळेल. पंजाब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ५९ जागांची गरज आहे.

तर इंडिया टुडे- अॅक्सिस आणि इंडिया न्यूज-एमआरसी या मतदानोत्तर चाचण्यांनुसार पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी सरासरी ६० जागांवर आम आदमी पक्ष ५० जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. ‘आप’साठी हे यश लक्षणीय मानले जात आहे. तर उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि गोव्यात घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपच्या पदरात पंजाबमध्ये मोठी निराशा पडली आहे. भाजप आणि अकाली दलाला याठिकाणी सरासरी ६ जागाच मिळतील, असा अंदाज या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे.

पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी ११०० उमेदवार रिंगणात होते.  तब्बल १.४ कोटी लोकांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. सत्ताधारी अकाली दल आणि भाजप , काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत याठिकाणी आहे. लंबी मतदारसंघातील पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमरिंदर सिंग , जलालबादमध्ये आपचे खासदार भगवंत मान आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबिर सिंग बादल यांच्यातील लढती लक्षवेधक ठरणार आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू लढवत असलेल्या अमृतसर पूर्व मतदारसंघाच्या निकालाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

 

इंडिया टुडे-अॅक्सिसच्या अंदाजानुसार काँग्रेस पंजाबमध्ये ६२-७१ जागा जिंकून सहजपणे सत्ता मिळवेल. या सर्वेक्षणानुसार ढोबळ समीकरणे लक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या काँग्रेसला ३६ टक्के मते मिळाली आहे. तर आप पंजाबमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. त्यांना याठिकाणी ४२ ते ५१ जागा मिळण्याचा अंदाज असून आपला एकूण ३३.५ टक्के मते मिळतील. तर अकाली दल आणि भाजप सर्वात तळाला फेकला गेला असून त्यांना केवळ ४-७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरणार असून त्यांना ५९ ते ६७ जागा मिळतील. तर काँग्रेसला ४१-४९ जागा मिळतील. गेल्यावर्षीही पंजाबमध्ये काँग्रेसला ४६ जागाच मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदाही काँग्रेसची परिस्थिती तशीच राहण्याचा सी-व्होटरचा अंदाज आहे.

टुडेज चाणक्यने पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल. या दोन्ही पक्षांना ५४ जागा मिळणार असून त्यामध्ये ९ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. तर अकाली दल आणि भाजपला ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 

पंजाब (११७ जागा)

इंडिया टुडे | काँग्रेस (६२-७१), भाजप + अकाली दल (४-७), आप (४२-५१), अपक्ष (०-२)
अॅक्सिस माय इंडिया | भाजप + अकाली दल ( ७), आप (४२-५१), काँग्रेस (६२-७१), अपक्ष (२)
सी व्होटर | भाजप + अकाली दल (१३), आप (५९-६७), काँग्रेस (४१-४९), अपक्ष (३)