पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्यावर एका व्यक्तीने बूट फेकल्याची घटना घडली आहे. बादल यांच्या मतदारसंघातील लाम्बी-रट्टाखेडा येथे सभेदरम्यान ही घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पंजाब विधानसभा निवडणुकीचे रण तापले असून, सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या त्या-त्या मतदारसंघात सभा होत आहेत. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचीही त्यांच्या मतदारसंघात रट्टाखेडा येथे सभा झाली. त्याचवेळी एका तरुणाने त्यांच्या दिशेने बूट फेकला. या बूटफेकीमुळे त्यांचा चष्मा फुटला असून हातावरही तो लागला आहे. या प्रकारामुळे सभेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. त्याचदरम्यान, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

तत्पूर्वी, पंजाबमध्ये प्रचारसभेत प्रकाशसिंह बादल यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली होती. त्यावेळी पंजाबचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर विचारले असता, मुख्यमंत्री हा पंजाबचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तो कोणी मुख्यमंत्री असेल, तो पंजाबचाच असेल. पण दिलेली आश्वासने त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी असेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी बादल यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. पंधरा वर्षांत जितके पैसे तुम्ही खाल्ले आहेत, ते तुमच्या घशातून बाहेर काढीन. एकेक पैचा हिशेब घेतला जाईल, असेही केजरीवाल यांनी सांगितले.