आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सध्या एक समान गोष्ट आढळते, ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास. एके काळी पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राचा ऱ्हास ही चिंताजनक गोष्ट आहे. त्याबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेकडून समाजाच्या वेगळ्या अपेक्षा असत. पण त्याही दिवसेंदिवस फोल ठरत चालल्या आहेत. या सगळ्याच क्षेत्रांमध्ये चांगली माणसं नाहीत असं अजिबातच नाही. पण आजूबाजूची सडलेली, किडलेली व्यवस्था त्यांना टिकू देत नाही. तत्त्व, इमानदारी या सगळ्यापेक्षा ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा मूठभरांचे हितसंबंध तुम्ही सांभाळू शकत नसाल तर तुमच्या अस्तित्वाला काही अर्थच उरत नाही. तुम्हाला अशा सगळ्या व्यवस्थेत काडीचीही किंमत नसते. या सगळ्यामधून निखळ माणूस नामशेष कसा होत चालला आहे, अशी मांडणी करणारी ‘नामशेष होणारा माणूस’ ही जयसिंग पाटील यांची महत्त्वाची कादंबरी आहे.

रूढ अर्थाने जयसिंग पाटील यांची ही पहिलीच कादंबरी आहे. पण तिला पहिलेपणाचा नवखेपणा अजिबात नाही, हे विशेष. पाटील मूळचे पत्रकार. ‘वेडय़ा कुंभाराचं काय झालं’ हे त्यांचं नाटक. त्याशिवाय त्यांनी कथालेखनही केलं आहे. पत्रकाराला समाजात वावरताना समाजाच्या विविध क्षेत्रांतल्या घटनांचे, व्यक्तींचे एरवी सामान्यांच्या नजरेला येणार नाहीत, असे विविध प्रकारचे बारकावे दिसत असतात. त्यात कधी नोंद न घेतल्या गेलेल्या चांगल्या गोष्टी असतात तर समाजातल्या विसंगती. या विसंगतीचं काय करायचं हा प्रश्न संवेदनशील मनांना सतत भेडसावत असतो. काही जणांच्या बाबतीत तो एखाद्या कलेच्या माध्यमातून पुढे  येतो.

ही कादंबरी घडते ती ग्रामीण भागात. तिथली समाजव्यवस्था, माणसांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध, त्यातले ताणेबाणे, शिक्षणव्यवस्था, पत्रकारिता, त्यातले हितसंबंध या सगळ्यावर ती अतिशय भेदक असं भाष्य करते. ते करताना ग्रामीण जीवनातले सूक्ष्म तपशील कादंबरीत अतिशय सहजपणे येतात. कादंबरीतल्या व्यक्तिरेखांना हे सगळे तपशील अतिशय ठसठशीत बनवतात. त्यामुळे ठसठशीत व्यक्तिरेखा हे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. आजच्या माणसाच्या जगण्यातली गुंतागुंत ती तपशिलात मांडत जाते. वाचकही त्यात गुंतत जातो. आत्मशोधाच्या एका अटळ टप्प्यावर कांदबरीचा नायक येऊन पोहोचतो तिथपर्यंत ती वाचकाला खेचत घेऊन जाते. व्यवस्थेच्या ऱ्हासपर्वाबद्दलच लेखकाला प्रश्न उपस्थित करायचे असल्यामुळे ती कोणतीही उत्तरं न देता एका टप्प्यावर संपते, तेव्हा वाचकाच्या मनात विविध प्रश्नांचं मोहोळ तयार झालेलं असतं.

कादंबरीचा नायक नामदेव इंग्रजीचा प्राध्यापक आहे. तो, त्याचं कॉलेज, त्याचे सहकारी, त्याचे विद्यार्थी, एके काळी त्याचे आवडते शिक्षक असलेले आणि आता प्रिन्सिपल झालेले सीएमके, त्याचं कुटुंब हे त्याचं विश्व आहे. हे कॉलेज आहे, आबासाहेब डोंगरीकर पाटील यांचं. काँग्रेसच्या राजकारणाच्या मुशीत तयार झालेला हा माणूस आहे. सहकार आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सगळा तालुका एकेकाळी त्याच्या ताब्यात होता. आणि आता वयानुसार त्याने सगळी सूत्रं मुलाकडे सोपवायला सुरुवात केली आहे. मुलगा अमरसिंहदादा आबासाहेबांच्या एकदम विरुद्ध पद्धतीने राजकारण करू पाहणारा. आबासाहेबांनी निर्माण केलेलं सोहार्दाचं, नेमस्त वातावरण अमरसिंहदादाच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ढवळून निघतं. त्यातून निर्माण झालेले ताणतणाव शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या संस्थेतल्या सीएमकेंसारख्या, नामदेवसारख्या लोकांना अस्वस्थ करतात. तर ज्यांना शिक्षण सोडून बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये रस आहे, त्यांना त्यातून संधी मिळत जातात. या कादंबरीत अरुण कोलटकर कोण हे माहीत नसलेले मराठीचे प्राध्यापक, कवितांची आवड असलेले पोलीस अधिकारी, सतत नवऱ्याचा मार खाणाऱ्या आणि शेवटी स्वत:ला जाळून घेणाऱ्या प्राध्यापक बाई, नामदेवच्या आईला मारणारे त्याचे वडील, आधी बातमीदारीशी इमान राखणारा आणि नंतर तितक्याच सहजपणे त्या इमानाशी प्रतारणा करणारा पत्रकार, अतिशय सुसंस्कृत प्राचार्य पती-पत्नी आणि नंतर त्यांची झालेली होरपळ अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा समाजातल्या विविध प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करत आपल्यापुढे येतात.

अमरसिंहदादांच्या कामाच्या पद्धतीला कंटाळलेला नामदेव गावातला सगळा बाडबिस्तरा गुंडाळून विद्यापीठात येऊन दाखल होतो. तिथे प्राध्यापक म्हणून रुजू होतो. गावापासून, घरच्या लोकांपासून दूर येणं हे त्याच्या कुटुंबासाठी म्हणजे बायको-मुलांसाठी एकदम वेगळं वळण घेणारं, जणू काही जुन्या व्यवस्थेच्या जोखडातून सुटका करणारं ठरतं. त्यांचं बदललेलं वागणं नामदेवपुढे वेगळे प्रश्न निर्माण करतं.

सगळा गणगोत सोडून नामदेवचं शहरात निघून येणं हा एकप्रकारे देशीवादाचा व्यक्तिवादाकडे होणारा अटळ प्रवास अधोरेखित करत ही कादंबरी संपते.

नामशेष होत जाणारा माणूस, जयसिंग पाटील, प्रकाशक- लोकवाङ्मय गृह, मूल्य : १८० रुपये, पृष्ठे : १४७
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com