‘ब्रह्मांडाची कवाडं’ असं पुस्तकाचं नाव वाचल्यावर या पुस्तकात अवकाश आणि त्यातील रहस्य याबाबतीत वैज्ञानिक कल्पनाविलास असं चित्र डोळ्यासमोर उभं राहू शकतं; पण हा समज पूर्णपणे खोडून काढत या पुस्तकाने मानवाशी संबंधित विविध वैज्ञानिक विषयांना स्पर्श केला आहे. नेहमीच्या धाटणीच्या वैज्ञानिक विषयांची परंपरा मोडीत काढत नवीन विषयांमध्ये घेतलेला मानवी भावभावनांचा आढावा यामुळे हे पुस्तक आपल्याला वेगळ्या पातळीवर घेऊन जातं. विज्ञानकथा हे मराठी साहित्यातलं वैशिष्टय़पूर्ण दालन किती समृद्ध आहे, याचा प्रत्यय पुस्तकातून येतो.

पुस्तकाची सुरुवात ‘होमवर्ड बाऊंड’ या कॅप्टन सुनील सुळे यांच्या कथेने होते. चंद्रावरील सरपटणारे जीव, त्याचा पृथ्वीशी संबंध आणि त्या जीवांमधील शेवटी झालेला भावनेचा उद्रेक आपल्याला अंतर्मुख करतो. फक्त ब्रह्मांडातील साय-फाय फिक्शनपुरतं मर्यादित न राहता ‘डोपामाइन’ ही शरद पुराणिक यांची कथा सजीवसृष्टीतील सुंदर भावनेला, प्रेमाला हात घालते. डोपामाइनचं तंत्र उलगडत शेवटी अतुल पांडे आणि उत्तरा यांच्यातील प्रेमकहाणीचं रहस्य या कथेच्या शेवटी समोर येतं. प्रसन्न करंदीकर यांची ‘थर्ड फ्लोअर’ ही उत्कंठावर्धक आणि शेवटी अंतर्मुख करणारी आणखी एक कथा. विज्ञान अगदी कितीही पुढे गेलं असलं तरी नशिबाच्या खेळीसमोर कुणाचं काही चालत नाही अशाच प्रकारचा संदेश या कथेतून दिला आहे. सीताराम झेलेच्या नशिबामुळे म्हणा किंवा नियतीमुळे त्याच्या वाटय़ाला आलेल्या दु:खासमोर वैद्यकशास्त्रही थिटं पडतं आणि सुरू होतं ते डॉ. देशपांडेविरुद्धचं सूडसत्र. या सूडसत्राचा शेवट अचंबित करणारा आणि हृदयद्रावक असला तरी विचार करायला लावणारा असा आहे.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

या साय-फाय विज्ञानकथा मांडताना कुठेही कथेचा बाज बाजूला राहून गेलंय असं होत नाही. मनोरंजन करत त्या ठेवता विचार करायला लावतात, स्तंभित करतात, त्या वेळी खऱ्या अर्थाने वाचकाची नाळ त्याच्याशी जोडली जाते. लक्ष्मण लोंढे आणि डॉ. मेघश्री दळवी यांनी या कथांचं चांगलं संपादन करत वाचक या कथांमध्ये गुंतून राहतील याची पूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. चंदनाच्या लाकडांची सुवासिक मोळी या विज्ञानकथांच्या निमित्ताने त्यांनी बांधली आहे. वाचक त्या मोळीतून प्रत्येक लाकूड विलग करेल आणि त्याच्या सुगंधाचा दरवळ अनुभवेल.

या मोळीतील आणखी एक चंदनाचे लाकूड ‘क्लोन’ या संकल्पनेवर आधारित आहे. क्लोनचा नावीन्यपूर्ण आविष्कार आणि त्याने मानवी साखळीत होणारी उलथापालथ यातील एक नवी अहिल्या या स्मिता पोतनीस यांच्या कथेतून उलगडण्यात आली आहे. सुकन्याचा मुलगा शंतनू व सून चैतन्या एका वेगळ्या पेचात सापडतात. हा पेच त्यांच्यासमोर निर्माण होतो शंतनूच्याच क्लोन मुळे. पुढे या कहाणीचा शेवट जरी गोड आहे. मात्र यातील स्त्रीचा खंबीरपणा निश्चितच वाखाण्याजोगा आहे. भविष्यातील बदलांचा वेध घेत त्या वेळी माणसाची मानसिक स्थिती नेमकी कशी असेल, माणूस वैज्ञानिकदृष्टय़ा विकसित होईल, पण भावनिकदृष्टय़ा त्याचा विकास होईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे यानिमित्ताने आपल्याला मिळतात. ‘प्रमेय’ या डी.व्ही. कुलकर्णी यांच्या कथेतून डीप ब्रेन स्टिम्युलेशनचं तंत्र एका वेगळ्या अंगाने उलगडण्यात आले असून त्याला रहस्य व रोमांचकतेची छटा आहे. यशवंत सरनाईक यांच्या हातून भर गर्दीत रिव्हॉल्व्हरच्या गोळ्यांनी घडलेले खून, त्यामागील डॉ. लतिफचा हात यात नेमका काय संबंध आहे याचं उत्तर म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन. अशा प्रकारे भूतकाळाचा आणि भविष्याचा शोध घेणाऱ्या, वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या विज्ञानकथांमध्ये वाचक गुंतून पडतील हे नक्की.

कालप्रवास आणि परग्रहवासी हे साय-फाय लेखकांचे जितके आवडते विषय तितकेच वाचकांच्याही जवळचे. मात्र या विषयांना एक नवीन ‘ट्विस्ट’ देत वाचकांना खिळवून ठेवण्याची किमया लेखकांनी केली आहे. या कथा लिहणारे लेखक हे नवोदित असले तरी त्यांच्या कथांमधून तो नवखेपणा जाणवत नाही. या विज्ञानकथा असूनही कुठेही फक्त कल्पनाविलास वाटत नाही. साहित्य आणि भाषेच्या निकषातून तावून सुलाखून निघालेल्या आहेत याची प्रचीती येते. पुस्तकाची सुरुवातीपासूनच हळूहळू विज्ञानाची कवाडं विविध अंगांनी उलगडत जातात. कथा वाचताना त्या कुठेही बोजड होत नाहीत. फक्त माहितीपुरतं मर्यादित न राहता मनोरंजन करणारं साय-फाय फिक्शन ज्या वेळी विचार करायला उद्युक्त करतं त्या वेळी त्या खऱ्या अर्थाने आनंद देतात. हे सर्व लेखक मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या कार्यशाळेतून तयार झाले आहेत. येथे त्यांनी त्यांच्या लेखनाला आकार दिला आहे. प्रिया पाळंदे, सुरेश भावे, शरद पुराणिक, डॉ. मेघश्री दळवी यांच्या कथाही उत्कृष्ट आहेत. मराठी विज्ञानलेखकांच्या उद्याच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथा व लेखक विज्ञानकथांच्या दालनाला अधिक समृद्ध करतील यात शंका नाही.
ब्रह्मांडाची कवाडं, संपादन : लक्ष्मण लोंढे, मेघश्री दळवी, प्रकाशक : गार्गीज प्रकाशन, पाने : २३२, किंमत : २५० रुपये
अश्विनी पारकर – response.lokprabha@expressindia.com