प्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर िहदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात. कुणाचा तरी विरोध आणि मग त्यातून तरून जाऊन एकत्र येणं म्हणजे प्रेम असं तद्दन फिल्मी प्रेम आपल्याला सहसा माहित असतं. पण खरं तर प्रेम सुरू होतं, सहजीवन सुरू झाल्यानंतर. रोजच्या जगण्यातल्या एकमेकांच्या न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या अनेक गोष्टी, जगण्यातल्या अनेक कटकटी, संसारात आलेली वादळं या सगळ्यांना एकमेकांच्या साथीने तोंड देणं, एकमेकांसाठी पहाडासारखं उभं राहणं यातच प्रेमाची खरी कसोटी लागत असते. तिथे कोणतेही फिल्मी योगायोग घडत नसतात. एकमेकांवरचा विश्वास, आपल्या माणसाबद्दल वाटणारी ओढ, उद्या चांगलंच घडणार आहे, याबद्दलची आश्वस्तता या सगळ्यांनी रोजचा अवकाश भरून काढत प्रेम समृद्ध होत जातं. पहाडासारख्या संकटासमोर पहाडासारख्याच मनाने ठाम उभं राहून त्याला तोंड कसं द्यायचं असतं, ते शून्यातून सूर्याकडे या पुस्तकातून वाचायला मिळतं. डॉ. आरती दातार यांचं हे आत्मचरित्र आहे.

डॉ. आरती आणि अरुण दातार हे दोघंही आता सत्तरीच्या घरात आहेत. पण लग्नानंतर लगेचच म्हणजे तिशीच्या उंबरठय़ावर असताना अरुण दातारांना एसटीची बस पायावरून गेल्यामुळे झालेला जीवघेणा अपघात, महिनोन् महिने हॉस्पिटल, सतत वेगवेगळी ऑपरेशन्स, उपचार, या काळात आलेले लोकांचे वेगवेगळे अनुभव, त्या काळात आणि त्यानंतरही एकमेकांना दिलेली साथसोबत या सगळ्याबद्दल डॉ. आरती दातार यांनी लिहिलेले आहे. सकारात्मक विचारांनी परिस्थितीवर, संकटावर कशी मात करता येते, याचा जिवंत अनुभव पुस्तक वाचताना येतो. आज वैद्यकशास्त्र अतिशय विकसित झालेलं आहे. पण सत्तरच्या दशकात अत्यंत भयंकर अशा अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला शारीरिक आणि मानसिक पातळीवर तोंड देणं अपघातग्रस्त व्यक्तीला आणि तिच्या जवळच्या माणसाला किती उद्ध्वस्त करणारं होतं, हे उपचारांचे तपशील वाचताना समजतं. तेव्हाच्या त्या अपघाताचं स्वरूप पाहता आज स्वत:चं जिम चालवणारे डॉ. अरुण दातार हा चमत्कारच वाटतो. चाळीसेक वर्षांनंतरच्या या घटना अतिशय तपशीलवार तरीही अतिशय संयमितपणे सांगितलेल्या आहेत. पतीपत्नींमधील प्रेमाचं एक अनोखं रूप या पुस्तकातून वाचायला मिळतं.
शून्यातून सूर्याकडे, डॉ. आरती दातार, विहंग प्रकाशन, पृष्ठे- १७६, मूल्य-१५० रुपये
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…