नैसर्गिक साधनसामग्रीने समृद्ध असलेल्या बोलिविया देशात कोकच्या पानांना पवित्र मानलं जातं. कडाक्याच्या थंडीत थंडीपासून बचाव म्हणून कोकची पानं चघळली जातात. त्या पानांचा चहा, औषधी वापर, ऊर्जा देण्यासाठी वापर होत असल्याने कोक म्हणजे बोलिवियाचा कल्पवृक्ष. कोक तेथील स्थानिकांच्या जीवनातला अविभाज्य घटक. मात्र कोकच्या पानांवर रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येणाऱ्या कोकेनमुळे या पवित्र वनस्पतीची लागवड येथील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. अमेरिकेच्या दबावामुळे बोलिविया सरकारने कोकची शेतीच नष्ट करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत कोकेन भट्टीतून सुटका करून घेतलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिएगो ज्युआरेझ आणि बोलिवियाच्या शेतकऱ्यांची मुक्त जीवन जगण्याची लढाई म्हणजे ‘सेक्रेड लिफ’ ही सत्यकथा.

पुस्तकाच्या प्रारंभीच दिएगो ज्युआरेझने स्मिथ नावाच्या गुंडापासून सुटका करून पळ काढलेला असतो, त्यापूर्वीची दिएगोची पाश्र्वभूमी थोडक्यात सांगितली आहे. तो एका घराजवळ येऊन पोहोचतो ते घर असतं रिकार्डो यांचं. रिकाडरे कुटुंब त्याला आसरा देतं. केवळ आसरा देऊनच थांबत नाही तर त्याला मायाही देतं. आपुलकीनं त्याचा सांभाळ करतं. रिकाडरे कुटुंबीयांनी कोकची लागवड केलेली असते. कोकचं पीकही चांगलं झालेलं असतं. आता त्याची विक्री करून आलेल्या पैशात अनेक गोष्टी करायच्या असतात. दिएगोसह रिकाडरे कुटुंबातील प्रत्येकजण येणाऱ्या पैशातून काय काय करायचं याचं स्वप्न पाहात असतो. दिएगोला त्या पैशातून कोचाबाम्बा तुरुंगात असणाऱ्या आई-वडिलांकडे जाऊन त्यांची सुटका करायची असते. मात्र त्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक लष्कराच्या तावडीत सापडतं.

दिएगोचं स्वप्न भंग पावतं. शिवाय लष्कराच्या लोकांना प्रतिकार केल्यानं त्याला बंदीही बनवलं जातं. रिकाडरे कुटुंबीय आणि स्थानिक शेतकऱ्यांमुळे त्याची सुटका होते खरी पण तिथूनच सर्वाची मुक्त जगण्याची लढाई सुरू होते. बोलिवियात रास्ता रोको करून सरकारनं त्याचं कोकचं पीक परत करावं अशी मागणी केली जाते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिएगोही नकळत सामील होऊन जातो. आंदोलन कसं चालतं, त्यातील लोकांचा, लष्कराचा, आंदोलनामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांचा पवित्रा नक्की काय असतो, याची सविस्तर माहिती इथे आहे. आंदोलनाचा शेवट काय होतो हे वेगळं सांगायची गरज नाही. एखाद्या ठोस नेतृत्वाशिवाय सामान्य जणांनी केलेलं आंदोलन लष्करापुढे किती काळ तग धरू शकणार? इथल्या आंदोलनाचीही स्थिती नेमकी तशीच होते. पण त्यातील दिएगोच्या असामान्य कर्तृत्वामुळे त्याची भेट त्याच्या आई-वडिलांशी तर होतेच शिवाय त्यांच्या सुटकेची आशाही निर्माण होते. आंदोलनानं बरंच काही साध्य झालेलं असतं दिएगोच्या आणि शेतकऱ्यांच्याही जीवनात.

दहशतवाद, मूलतत्त्ववाद, अंधश्रद्धा त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम याविषयी आपण वाचत असतो, ऐकत असतो. त्या घटना आपल्याला अस्वस्थ करतात. पण ही अस्वस्थता नेमकी अनुभवण्यासाठी आपण मुद्दाम प्रयत्न नक्कीच करत नाही. जगात असे अनेक लोक आहेत की, जे ही अस्वस्थता अनुभवायला जातात. मुद्दामच. हो पण ती कृती अकारणच नसते. केवळ पाहणं हा हेतूही नसतो. त्यात त्यांची तरलता, समाजकार्य करण्याचं ध्येय आणि धाडसीपणाही असतो. त्यातून सामान्यांना मिळतं जिवंत अनुभवाचं साहित्य. पुस्तकाच्या मूळ लेखिका डेबोरा एलिस या अशाच साहित्यातून आपल्याला भेटतात आणि त्यांचं लेखन आपल्याला अस्वस्थ करून सोडतं. ‘ब्रेडविनर’, ‘परवानाज् जर्नी’, ‘मड सिटी’, ‘किडस् ऑफ काबूल’, ‘आय अ‍ॅम टॅक्सी’ आणि इतर सत्यकथा आपल्याला हेलावून टाकतात. ‘सेक्रेड लिफ’ हेही त्याला अपवाद नाही.

डेबोरा यांचं लिखाण वास्तववादी आणि जिवंत आहे, कारण अंगावर शहारे आणणारे अनुभव त्यांनी स्वत: घेतलेले आहेत. त्यात अनेकदा त्यांना स्वत:चा जीवही धोक्यात घालावा लागलेला आहे. म्हणूनच त्यांची पुस्तकं वाचताना आपणही त्या अनुभवातून केवळ भारावून जात नाही तर नकळत आपल्यातही बदल घडत जातात.

‘सेक्रेड लिफ’मध्ये दिएगोचा रिकाडरे कुटुंबीयांमध्ये वावरताना होणारी घालमेल, शेतकरी आंदोलनातील त्याचा सहभाग त्यामागची भूमिका पाहिली की एवढय़ा लहान वयातही मुलं किती मोठं कार्य करू शकतात याचं नवल वाटल्याशिवाय राहात नाही. त्याचप्रमाणे बोनिता आणि तिच्या भावांबरोबर राहताना त्याची निरागसता, त्याची कोवळीकही पाहायला मिळते. परिस्थितीने त्याला अचानक प्रौढ बनवल्याचं खटकत राहातं. मुलांमध्ये अफाट ताकद असते. कुवतीपलीकडे काम करण्याची ताकद त्यांच्यात असतेच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्यात पाहायला मिळते ती म्हणजे कठीण परिस्थितीत सहनशक्ती पणाला लावून तोंड देणं. दिएगोचे हेच गुण इथे आपल्याला आकर्षित करतातच, पण खूपशा गोष्टी शिकवूनही जातात.

‘सेक्रेड लिफ’चा अनुवाद करताना मेघना ढोके यांनी डेबोरा यांचे अनुभव अधिक जिवंत केले आहेत. डेबोरा यांच्या लिखाणामागची अस्वस्थता त्यातून अनुभवायला मिळते हेच त्यांच्या लिखाणाचं वैशिष्टय़ म्हणता येईल.

सेक्रेड लिफ, मूळ लेखिका : डेबोरा एलिस, अनुवाद : मेघना ढोके, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे : १३४, मूल्य : १४० रुपये.
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com