सध्या आयसिस ही जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेली दहशतवादी संघटना आहे. वेगवेगळे कर, तेल विक्री आणि अमली पदार्थाच्या व्यापारातून आयसिस दरमहा ८० दशलक्ष डॉलर्सची कमाई करते, असा अंदाज आहे. या उत्पन्नात एकटय़ा तेलक्षेत्राचा वाटा ४३ टक्के आहे. आयसिसप्रमाणेच प्रत्येक दहशतवादी संघटना स्वत:ची अर्थव्यवस्था तयार करते. धर्म आणि अफूची सांगड घालत तालिबान्यांनी अफगाणिस्तानला पोखरून टाकले आहे. अफूच्या शेतीतच अफगाणिस्तानातील दहशतवादाची बीजे रोवली गेल्याचे जळजळीत वास्तव ज्येष्ठ पत्रकार व लेखिका ग्रेचेन पीटर्स यांनी आपल्या ‘सीड्स ऑफ टेरर’ या पुस्तकाद्वारे अधोरेखित केले आहे. इंग्रजीतील हे पुस्तक अभिजित पेंढारकर यांनी मराठीत अनुवादित केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ‘एबीसी’ न्यूजसाठी काम केलेल्या ग्रेचेन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला वार्ताकनाचा बाज आहे. त्यात अफूच्या शेतीतून पोसला जाणारा तालिबानचा दहशतवाद आणि अमली पदार्थाचे जाळ्याचे भेदक चित्रण आहे.

अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाच्या लष्कराविरोधात जिहाद पुकारण्यासाठी मुजाहिदीनांना प्रामुख्याने अमेरिका आणि सौदी अरेबियातून लाखो डॉलर्सची मदत मिळत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून ही मदत पोहोचवली जात होती. या काळात आयएसआयला अर्थात पाकिस्तानला मोठे महत्त्व प्राप्त झाले. १९७७ मध्ये भुट्टो सरकार उलथवून सत्तेवर आलेल्या झियांना अमेरिकेने तेवढय़ाच कारणासाठी जवळ केले. ऐंशीच्या दशकात अफगाणिस्तानातील अफूवर प्रक्रिया करून अमली पदार्थाचा व्यापार अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरू होता. मात्र, सोव्हिएत रशियाला शह देण्यावर भर दिल्याने अमेरिकेने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शीतयुद्धाच्या अखेरच्या काळात अमेरिकेला अफूच्या पिकाचा धोका लक्षात आला. त्याविरोधी लढय़ात सहकार्य करावे, या अमेरिकेच्या मागणीला तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी मान्यताही दिली मात्र, ती पोकळ ठरली. अफगाणिस्तानच्या पश्चिमेला हेल्मंद प्रांतातून संरक्षणाखाली ट्रकच्या ट्रक भरून अमली पदार्थ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून इराणला आणि पुढे तुर्कस्तानला रवाना होत.

8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?
Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

इराकचा नेता सद्दाम हुसेन याने १९९० मध्ये कुवेतवर कब्जा केला आणि पुढच्याच वर्षी सोव्हिएत महासंघाचे तुकडे झाले. त्यानंतर काही वर्षांतच अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली. अमली पदार्थाचे सेवन करण्यास तालिबानचा विरोध असला तरी त्याच्या व्यापारातून बक्कळ पैसा मिळविण्यास त्यांची ना नव्हती. अफूचे पीक घेणारा हेल्मंद प्रांत आकाराने पश्चिम व्हर्जिनिया प्रांताइतका आहे. अफूच्या व्यापाऱ्यांकडून अर्थपुरवठा मिळविण्याबरोबरच अफूच्या शेतातच १० टक्के कर तालिबान वसूल करीत होते. तालिबानचा मोठा अर्थपुरवठादार होता मुल्ला अख्तर मोहम्मद उस्मानी. २००६ मध्ये अमेरिकेने उस्मानीचा खात्मा केला. ११ सप्टेंबरच्या ट्विन टॉवरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पावले उचलली. त्याच वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानात लष्कर तैनात केले. तालिबानचा नेता मुल्ला ओमर आणि अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन यांच्यातील संबंधही पुढे स्पष्ट झाले. तालिबानबरोबरच अल-कायदालाही अमली पदार्थाच्या व्यापारातून रसद मिळत होती. पाश्चिमात्य देशांना खिळखिळे करण्यासाठी ओसामा बिन लादेन याने अफगाणिस्तानात अफूच्या व्यापाराला प्रोत्साहन दिल्याचे आयएनएलचे माजी अध्यक्ष रॅण्ड बिअर्स यांनी २००२ मध्ये सिनेट समितीला सांगितले होते. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यासाठी अल कायदाला फक्त पाच लाख डॉलर्स इतका खर्च आल्याचे हल्ल्याच्या तपासासाठी नेमलेल्या आयोगाने म्हटले आहे. इतका पैसा दहशतवादी गट अमली पदार्थाच्या व्यापारातून एका आठवडय़ात कमावू शकतात. कॅसा ब्लँका येथे २००३ मध्ये ४५ जणांचा बळी घेणारा बॉम्बस्फोट, जिब्राल्टरच्या खाडीत २००२ मध्ये अमेरिका आणि ब्रिटनच्या जहाजांवर बॉम्बफेक करण्याचा प्रयत्न हे अमली पदार्थाच्या पैशातूनच झाल्याचा युरोपातील अधिकाऱ्यांचा दावा आहे.

डीईएच्या अंदाजानुसार अफूच्या व्यापारातून तालिबानला त्यांच्या एकूण अर्थपुरवठय़ापैकी ७० टक्केवाटा मिळतो. यूएनओडीसीच्या आकडेवारीनुसार सन २००७ मध्ये अफगाणिस्तानातील ८२०० टन अफू उत्पादनापैकी ८० टक्के माल तालिबानच्या ताब्यातील प्रदेशातून आला होता. शिवाय तालिबानच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात ५० हून अधिक हेरॉइननिर्मिती कारखाने आहेत. तेथे प्रत्येक किलोमागे तालिबान २५० डॉलर वसूल करीत होते. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील उबदार, कोरडय़ा हवामानात अफूचे पीक फोफावते. अफूच्या काळ्याभोर बिया पेरल्यानंतर तीन महिन्यांत त्यावर टपोरी फुले डोलू लागतात. पाकळ्या गळून पडल्यानंतर एक हिरवी शेंग दिसू लागते. त्यात जाडसर, दुधाळ रस असतो. तीच ही अफू. शेतकरी धारदार चाकूने कळ्या कापून रस अलगद काढून घेतात.

अफगाणिस्तानात अफूची शेती हाच बहुतांश शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे. अमली पदार्थाचे तस्कर आणि व्यापारी यांचे जाळेच असे आहे की, अन्य कोणतीही शेती पिकवली तर व्यापारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असे शेतकरी सांगतात. अफूची शेती नष्ट करण्यासाठी आलेल्या लष्कराच्या पथकापुढे मातीच्या घरातील एक शेतकरी रडवेल्या चेहऱ्याने पुढे आला. पिके नष्ट करणाऱ्या पथकासमोर त्याची दोन दांडगी मुलेही उभी राहिली. आम्हाला मारून तरी टाका. तुम्ही हे पीक नष्ट केल्यानंतर तसेही आम्ही मरूनच जाणार आहोत, अशी कैफियत त्यांनी मांडली, हा ‘सीड्स ऑफ टेरर’ या पुस्तकात उल्लेख केलेला प्रसंग खूप बोलका आहे. लेखिका ग्रेचेन पीटर्स यांनी पुस्तकात अमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक उपायही मांडले आहेत. त्यात शेतकऱ्यांना पर्यायी पीक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचाही समावेश आहे.

हे पुस्तक अमली पदार्थाचा व्यापार आणि तालिबान याभोवती फिरत असल्याचे वाटत असले तरी त्यात वार्ताकनाच्या पलीकडे जाऊन केलेले सखोल संशोधन आढळते.

सीड्स ऑफ टेरर, लेखिका : ग्रेचेन पीटर्स, अनुवाद : अभिजित पेंढारकर, प्रकाशन : अमेय प्रकाशन, पृष्ठे : २२३; मूल्य : रु. २५५
सुनील कांबळी – response.lokprabha@expressindia.com