06 April 2020

News Flash

दखल पुस्तकांची : दुरून कुठून तरी

आला श्रावण श्रावणसारख्या कवितेतून पावसामुळे बळीराजाचं हिरवं नशीब कसं खुललं याचं प्रसन्न वर्णन आहे.

माझी कविता वेदनेचा हुंकार आणि सुखाचा उद्गार आहे असं कवी म्हणतो तेव्हाच त्याचं त्याच्या कवितेशी असलेलं नातं स्पष्ट होऊन जातं. माणसातलं हरवत चाललेलं माणूसपण, सर्वच बाजूंनी कोंडीत सापडलेलं सामान्यांचं जनजीवन आणि मानवी जीवनाविषयीचे चिंतन हे आपल्या कवितेचं सूत्र असल्याचं कवी दिलीप पाटील यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे. त्यांच्या या सुस्पष्ट भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या कवितेकडे बघितलं तर आपल्या आसपासचं सगळं वास्तव टिपण्याचा संवेदनशील प्रयत्न ते करतात असं दिसून येतं. या कवीला यंत्रयुग, शहरीकरण, जागतिकीकरण, त्यातले व्यवहार आणि त्या सगळ्याशी जोडलेलं आजच्या माणसाचं जगणं या सगळ्याचं व्यापक भान आहे. आला श्रावण श्रावणसारख्या कवितेतून पावसामुळे बळीराजाचं हिरवं नशीब कसं खुललं याचं प्रसन्न वर्णन आहे. आईचा जन्म या कवितेत ‘आई झेलते भार पोटात, आणि दुख चावून ओठात, मानवतेची शिकवण आई, शिकते कोणत्या विद्यापीठात’सारख्या ओळी अचानकपणे समोर येतात तेव्हा आपण स्तंभित होतो. ‘उभा जन्म झाला वासनांचा ठाव, तृप्तीचा गाव दिसेचि ना’ या शब्दातून कवीने त्याला नेमकं कुठं पोहोचायचं आहे, हे सांगितलं आहे. लग्न करून सासरी निघालेल्या, आई-वडील-भाऊ यांच्या गळ्यात पडून वियोगाच्या दु:खाने रडणाऱ्या लेकीला निरोप देताना आईवडील सासू-सासऱ्यांशी प्रेमाने वाग, सगळ्यांना जोडून घे वगैरे सांगतातच, शिवाय असंही म्हणतात की ‘करू नको सहन पोरी, अन्याय वा अत्याचार, तशी दिसता लक्षणे कर वेळीच प्रतिकार.’ नेहमी मुलीला सोसण्याचा सल्ला देण्यापेक्षा वेळ पडली तर प्रतिकार कर असं सांगणारे समर्थ आईवडील हे या कवितेचं वैशिष्टय़ आहे. या सगळ्या जगाकडे बघताना कवीला नेमके कसे वाटते याचं सुंदर वर्णन पाटील यांच्या कवितेत आलं आहे. ते म्हणतात, कवीला हायसं वाटतं, सायंकाळी पाठीशी दप्तर घेऊन, घराकडे धूम ठोकणारी निष्पाप आनंदी बालके पाहून. सगळ्या व्यापारीकरणाच्या धबडग्यातही कुठे तरी व्यापाराच्या पलीकडचा निष्पापपणा शिल्लक असल्याचा हा धागा कवीला आनंद देतो; तर दिलीप पाटील यांची कविता अशी जगण्याशी नाते जोडणारी आहे.

दुरून कुठून तरी, दिलीप पाटील, प्रतिमा पब्लिकेशन्स, पृष्ठे- ९५, मूल्य- १३० रुपये
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2016 1:08 am

Web Title: marathi book durum kuthun tari review
Next Stories
1 दखल पुस्तकांची : रंग वेगळा
2 दखल पुस्तकांची : कविता दोघांची
3 कल्पनातीत थरारयुद्ध
Just Now!
X