चित्रकार सुहास बहुळकर सर. ज. जी. कला महाविद्यालयाचे विद्यार्थी. व्यक्तिचित्रण करणारे चित्रकार (पोर्टेट पेंटर) म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी लिहिलेल्या   १) बॉम्बे स्कूल आठवणीतले, अनुभवलेले, २) गोपाळ देऊसकर: कलावंत आणि माणूस  ३) आयुष्याची मौल्यवान माती: शिल्पकार करमरकर या तीन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच झाले. गेल्या वर्षभरात बहुळकरांनी याखेरीज दीपक घारे व इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने शिल्पकार चरित्रकोशाच्या दृश्यकला खंडाचेही संपादन केले आहे.

बहुळकर चित्रकार गोपाळ देऊसकरांचे शिष्य होते. त्यामुळे ‘बापू’, (देऊसकरांना त्यांच्या जवळचे बापू म्हणून ओळखायचे) त्यांनी माणूस व कलाकार म्हणून अगदी जवळून बघितले. बहुळकरांच्या लिखाणात महान कलाकारांना जवळून पाहणारा एक विद्यार्थी दिसतो. जो अगदी सतर्कतने पण त्याचवेळी प्रेमाने, बऱ्याचशा भारावल्या अवस्थेत, आपल्यासाठी ‘आदर्श’ असणाऱ्या कलाकार, शिक्षकाकडे पाहतो. त्यांच्या सवयी, नखरे, चर्चा, विचारविनिमय, व्यक्तिगत जीवन, कलानिर्मिती, त्याची प्रक्रिया, प्रत्यक्ष कलाकृती आदी गोष्टी एक साक्षी म्हणून पाहतो आणि बऱ्याच वेळा या गोष्टींची, भगवंताच्या लीलांची चर्चा करावी अशा प्रकारे चर्चाही करतो. याचा फायदा असा होतो की वाचकाच्या डोळ्यांसमोर चित्रकारांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचं जीवन, कला, त्यांच्या कारकिर्दीचा काळ आदी गोष्टींचा अगदी आँखो-देखा हाल समोर उभा राहतो. वाचकाला बहुळकर आपल्या भूमिकेमध्ये सहजपणे घेऊन जातात आणि कलाकारांचं ‘दर्शन’ घडवतात. बहुळकर हे शिल्पकार करमरकरांचे शिष्य नसले तरीही त्यांच्यासंबंधात संशोधन करताना बहुळकरांमधील चित्रकार, चित्रकलेचा विद्यार्थी जागाच आहे. परिणामी एखाद्या डॉक्युमेंट्रीप्रमाणे ते या दोन प्रतिभावंताच्या जवळ व दूर जात त्यांचा एक माणूस व कलाकार दोन्ही अंगानी दर्शनं घडवतात.

शिल्पकार विनायक करमरकरांवरचे पुस्तक हे देऊसकरांच्या पुस्तकाप्रमाणेच दर्जेदार झालंय. करमरकरांचे जीवन, जीवन व कलेविषयक दृष्टिकोन, कलानिर्मिती, त्यासंबंधीचे अपार कष्ट, विचारप्रक्रिया, त्याला मिळालेला प्रतिसाद, त्यांचे शिस्तशीर नेटके जीवन व दिनक्रम, भावजीवन अशा अनेक पैलूंना बहुळकर अगदी सहजपणे वाचकासमोर मांडतात. बहुळकरांच्या कथनाचं एक वैशिष्टय़ म्हणजे ते कलाकृती निर्मिण्याची प्रक्रिया, त्यात गुंतलेल्या व्यक्ती, त्या संबंधीच्या घटना, त्यातून तयार झालेली वैशिष्टय़पूर्ण कलाकृती, तिची सौंदर्यस्थळे यांचं असं काही वर्णन करतात की त्यातून कलाकृतींचं रसग्रहण व कलाकृतीसंबंधीच्या घटना, आठवणी यांचं मिश्रण होऊन एक अजब रसायन तयार होतं.

बहुळकर या चित्रकारांची कला, त्यांचे समकालीन कलाकार, समकालीन कलाप्रवाह, वातावरण आदींचा व्यूह घेऊन कलाकारांकडे व्यापक दृष्टीनेही पाहतात. त्यातून ते या कलाकारांचं तुलनात्मक मूल्यमापन करातात.

या प्रकाराचा मोठा व्यूह घेणारे पुस्तक बॉम्बे स्कूलवरचं आहे. ते वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन असलं तरीही, महाराष्ट्राच्या व भारतीय चित्रकलेच्या इतिहासात दुर्लक्षित चित्रकारांना प्रकाशित करणारे हे लिखाण आहे. ज्यामुळे प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुपच्या समांतर महाराष्ट्रात घडलेल्या कलानिर्मितीला ओळख मिळेल. या सर्व कलाकारांना ‘बॉम्बे स्कूल’ अशा नांवाखाली एकत्रित करून वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.

हे सर्व लिखाण आतापर्यंत अप्रकाशित माहिती भरपूर प्रमाणात वाचकांना, विद्यार्थ्यांना देते. ज्याच्या आधारावर या सर्व भूतकाळातील कलाप्रवाह, कलाकार यांच्याविषयी संकल्पनाघाटित वैचारिक भूमिका तयार करून इतिहासाची अजून एक समज प्राप्त करून घेता येईल. बहुळकरांची चित्रे त्यांच्या लिखाणाप्रमाणेच भविष्यातील चित्रसंकल्पनाचा वेध घेण्याचे सर्व संकेत देतात.

lp64
चित्रकार गोपाळ देऊसकर, कलावंत आणि माणूस, लेखक : सुहास बहुळकर, प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पृष्ठ संख्या : २७२, मूल्य : ३५०/- रु.

lp63
शिल्पकार करमरकर, लेखक : सुहास बहुळकर, प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पृष्ठ संख्या : ३२४, मूल्य : ४००/- रु.

lp65
बॉम्बे स्कूल, आठवणीतले, अनुभवलेले, लेखक : सुहास बहुळकर, प्रकाशक : ग्रंथाली, पृष्ठ संख्या : २८३, मूल्य : ६००/- रु.

महेंद्र दामले – response.lokprabha@expressindia.com