कुठलीही पूर्वसूचना न देता, एखादा शकुन किंवा लक्षणसुद्धा न दाखवता हे अगदी शक्य आहे. बंद पडली असं वाटणाऱ्या एका प्रणालीतून एखादी मूक लाट जन्माला येतेय. एक ओहोळ कार्यरत झालाय. ही लाट उलटल्यावर फिरते ती तिच्या शिरावर सर्व समजून आणि कळून फिरते, ज्यामुळे एक खोल  तीव्र आणि अस्थिर वातावरण निर्माण होतं. जेव्हा निराशा धडकते, तेव्हा ती तशीच असते.. असं निराशेचं सायक्लोजेनेसिस सुरुवातीलाच ध्वनित करून, वादळाच्या अनिश्चिततेला प्रतिध्वनित करत रेखलेली ही कादंबरी- ‘विस्मरणातच सर्व काही’.

अनिता नायर यांनी  ‘लेसन्स इन फग्रेटिंग’ ही इंग्रजीत लिहिलेली कादंबरी स्मिता लिमये यांनी मराठीत अनुवादित केली आहे. एक घटस्फोटित हवामान आणि वादळतज्ज्ञ जे. ए. कृष्णमूर्ती ऊर्फ जॅक नुकताच फ्लोरिडाहून भारतात परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षांची मुलगी, स्मृती, आठवणींच्या मूíतमंत दुखद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामिळनाडूमधल्या समुद्राकाठच्या एका लहान आणि अनोळखी गावात तिच्याबद्दल नेमकं काय घडलं?  ‘मुलगी वाचवा’ मोहिमेत सहभागी झालेली आपल्या मुलीवर ही वेळ यावी असं नेमकं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतींचे मित्रमत्रिणी नाहीसे झालेत. एक स्तब्धता आणि भयाची िभत त्या घटनेला घेरून आहे. हवामान आणि वादळतज्ज्ञ असलेल्या जॅकच्या लेकीच्या आयुष्यात असं नेमकं कुठलं वादळ आलं, याचा मागोवा घेण्यासाठी जॅक स्वत:च प्रयत्न सुरू करतो. या शोधादरम्यान कौटुंबिक वादळाच्या तडाख्यात अडकलेली त्याची कॉर्पोरेट मीरा गिरिधर योगायोगाने त्याच्या आयुष्यात येते. या दोघांचीही आयुष्यं एकमेकांत गुंतली जातात, वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे.

कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर काही चित्रांच्या रेखाटनांचा वेध घेत वादळ आणि मानवी आयुष्यातल्या अनिश्चिततेला अधोरेखित करणारे साम्य-भेद जॅकच्या लेखणीतून व्यक्त होतात. त्या अनुषंगाने कादंबरीचं कथानक प्रत्येक टप्प्यावर उलगडत जातं. कथानकाचा विचार करता अनिता नायर यांची स्त्री चित्रणातली हातोटी प्रकर्षांने जाणवते. मध्यमवयीन कॉर्पोरेट पत्नी मीरा, गतवैभवात रमलेल्या म्हाताऱ्या सारे आणि लिली, तरुणपणातली आणि वय झालेली  कलाचित्ती, नयनतारा आणि स्मृती या दोन तरुणी, या वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया बारकाईने आणि खुबीने रंगवल्या आहेत. कादंबरीत उल्लेखलेली स्थळं, वातावरणही समर्पक रेखाटलेली आहेत.

अनिश्चितता आणि अस्वस्थता या मूळ गाभ्याभोवती रचलेलं हे कथानक मराठीत वाचताना काही ठिकाणी, अनुवाद न वाटता, इंग्रजी वाक्यांच्या शब्दश: भाषांतर केल्यासारख्या वाक्यरचनांमुळे रसभंग होतो.

कादंबरीच्या सुरुवातीलाच ध्वनित केलेली वादळाच्या आणि मानवी आयुष्यांच्या बाबतीत असलेली अनिश्चितता कथानकातही जाणवते, आणि समोर येते, ती या अनिश्चिततेमुळे निर्माण होणारी खळबळ. मीरा, जॅक या  आणि कादंबरीतल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा भाग आहे ही अनिश्चितता आणि खळबळ. म्हणूनच ‘विस्मरणातच सर्व काही’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची, आणि पुर्नसधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे.

विस्मरणातच सर्व काही – अनुवादित कादंबरी, मूळ लेखिका – अनिता नायर, अनुवाद – स्मिता लिमये, प्रकाशक – मेहता पब्लििशग हाउस, किंमत   – रु. ३२० मात्र, पृष्ठ संख्या – ३१०
दुहिता सोमण – response.lokprabha@expressindia.com