पुनीत म्हणजे पवित्र, निर्मळ. म्हणूनच स्त्रीचे प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी, भक्ती, ममता अशी अनेक नाती या पुस्तकातील कथांमधून वृद्धिंगत होताना दिसतात. स्त्री ही आई, मुलगी, आत्या, काकू, मावशी, आजी, सखी, सासू, सून, बहीण अशा नात्यांच्या धाग्यात गुंफलेली असते. त्या नात्यांमधील बंध या कथांमधून दिसून येतात. स्त्रियांचे दु:ख, वेदना कमी करणे; किंबहुना ते हलके करण्याचा, त्यांच्या मनाचा शोध घेण्याचा, त्यांच्यातील विविध छटांचे पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न लेखिकेने या पुस्तकातून केला आहे. ग्रामीण स्त्री, तिचा संसार, विचार, संस्कृती, रूढी, परंपरा या बंधनात अडकणारी, त्याग, ममता, प्रेम भरभरून देणारी स्त्री लेखिकेच्या कथांमधून दिसते. एखादी घाबरणारी तर दुसरी सर्व बंधने तोडून पंख लावून उडणारी अशा अनेक स्त्रियांच्या कथा या कथासंग्रहामधून वाचायला मिळतात. विशेषत: या कथांमधील देवदूत, आई : एक जीवनसारथी, पोरकी, समुपदेशनाच्या चष्म्यातून आणि कवडसा या स्त्री जीवनावर आधारित असलेल्या कथा विशेष वाचनीय आहेत.

पुनीत, लेखिका-पी.ए. आत्तार, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे-११०, मूल्य-रु. १२५/-
अनिल चव्हाण – response.lokprabha@expressindia.com