डॉ. राजा दांडेकर यांनी लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेल्या चिखलगाव आणि परिसरातील ४६ दुर्गम ग्रामीण खेडय़ांमध्ये समाजपरिवर्तनासाठी आणि खेडय़ांच्या पुनर्रचनेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या कार्यात त्यांना जे लोकसाधक भेटले त्यांच्या सत्यकथा म्हणजे ‘अशी घडली माणसं’ हे पुस्तक.

दापोली-दाभोळ रस्त्यावर, दापोलीपासून १२ किलोमीटरवर चिखलगाव आहे. १९८२ मध्ये डॉ. राजा दांडेकर आपल्या कुटुंबासह चिखलगावात आले. ‘लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास’च्या माध्यमातून काम करण्याची ‘लोकसाधना’ त्यांनी चिखलगावात सुरू केली. लाल मातीची कच्ची सडक, वीज नाही अशा स्थितीत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. दोन वर्षांनी परवानगी मिळाल्यावर गावातच माध्यमिक शाळा सुरू केली. सिनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका असणारी त्यांची पत्नी रेणू या शाळेत शिकवू लागल्या. हळूहळू आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वागीण ग्रामीण विकास अशा पाच क्षेत्रांत लोकांच्या गरजा ओळखून, त्या गरजांना पूरक अशी कामं त्यांनी सुरू केली. प्राथमिक, माध्यमिक शाळा, वसतिगृह, मुलींसाठी वसतिगृह, भोजनगृह, वाचनालय, स्मृतिवन अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आज लोकसाधनेचा वटवृक्ष झाला आहे.

या वटवृक्षासाठी अनेकांचे परिश्रम आहेत. चिखलगावच्या शाळेने अनेक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी घडवले असेच म्हणावे लागेल. जे इथे आले ते इथलेच म्हणजे चिखलगावचे, लोकसाधनेचेच झाले. त्यांच्या घडण्याच्या, घडवण्याच्या कथा डॉ. राजा दांडेकर यांनी मांडल्या आहेत.

‘रुजवा माणसांचा’, ‘काजवे’ आणि ‘लोकदीपोभव’ असे पुस्तकाचे तीन भाग आहेत. ‘रुजवा माणसांचा’मध्ये संस्थेसाठी जीव तोडून काम करणारे शिक्षक, कर्मचारी आणि सेवक आपल्याला भेटतात. ही माणसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेली, समाजाचे टक्केटोणपे सहन केलेली, काही ध्येयाने प्रेरित अशी होती. प्रत्येकाला काहीतरी करायचं होतं, समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि स्वत:च्या विकासासाठी. ध्येयाने झपाटलेल्यांना या सर्वाना अर्जुनाप्रमाणे एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे संस्थेचे काम करत करत विद्यार्थ्यांचा, गावांचा विकास साधायचा. हे करताना आपल्यातले न्यूनही घालवायचे. यात शाळेत मुलं गोळा करण्यापासून अगदी सुरुवातीला शिपायाचेही काम करणारे मारुती थोरात भेटतात. शाळेत येऊन चित्रकार, वक्ता, शिक्षक, कवी म्हणून स्वत:चीच ओळख झालेले अजित कांबळे भेटतात. यांच्याप्रमाणेच दिलीप जाधव, राकेश आंबेरकर, प्रीती पेवेकर, मधुकर काळे, नीलिमा भावे, मेघा पवार यांच्यासारखे २३ जण त्यांच्या कथांनी प्रेरित करतात.

‘काजवे’ या विभागाच्या सुरुवातीला लेखक एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, ‘प्रत्येक शाळा हे काजव्यांनी लगडलेलं झाड आहे. प्रत्येक मूल हे काजव्यासारखं स्वयंप्रकाशी असतं. त्या मुलाच्या अंतर्यामी दडलेला प्रकाश त्या मुलालाच नव्हे तर कुणालाच माहीत नसतो. ज्या वेळी त्याला त्याची जाणीव होते त्या वेळी समाजालाही त्या प्रकाशमान झालेल्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. हे आहे काजव्याचं स्वरूप!’ असे काजवे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर ज्यांनी आदर्शाचे वस्तुपाठ उभे केले ते.

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले वडील, त्यांच्या दहशतीत गेलेलं बालपण अनुभवलेली सुचिता, इंजिनीअिरगनंतर शिक्षणासाठी परदेशात गेल्यावरही ज्याला पुन्हा देशाच्या सेवेसाठी परतायचं आहे असा समीर, अपंगत्वावर मात करणारी कुंदा यांच्यासारखेच प्राची दुबळे, अस्मिता चाफे, सुनील गोरिवले असे वीस काजवे आपल्यासमोर खऱ्या अर्थाने चमकतात.

‘लोकदीपोभव’मध्ये ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन जे विद्यार्थी गावी परतले किंवा ज्यांनी तशी इच्छा केली किंवा जे शाळेत शिकलेल्या संस्कारांचा उपयोग आपल्या जीवनात करत आहेत अशांच्या कथा आहेत. यात अनेकजण देश-विदेशात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलेले आहेत. काही जण तशा अर्थाने सामान्य जीवन जगत आहेत, मात्र तरीही शाळेने दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण जोपासत आहेत. किसन जाधव, रूपेश बोरघरे, सुभाष काते अशा व्यक्ती आपल्याला शाळेने त्यांना नक्की काय दिलं ते कथन करतात. एकंदर पुस्तकातील तिन्ही भागांत भेटणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आहेत, त्यांचे कार्य वेगळे आहे तरीही प्रेरणादायी आहे. असं असलं तरी त्या व्यक्ती कशा घडल्या, त्या घडण्यामागची प्रक्रिया आपल्यासमोर येत नाही. ती प्रक्रिया लेखकाने दिली असती तर या कथा अजूनच प्रभावी ठरल्या असत्या. त्याचप्रमाणे पुस्तकातील व्यक्तींचा दीर्घकालीन संबंध लेखकाबरोबर असल्याचं जाणवत नाही, तर तो केवळ मुलाखतीपुरताच असल्याचं जाणवतं, ते सगळेजण शाळेशी, शाळेच्या संस्कारांशी बांधलेले दिसतात. त्या बांधिलकीची प्रक्रिया, माणसं घडवण्याची किमयाही लेखकाने सविस्तर द्यायला हवी होती.

प्रस्तावना, लेखकाची मुलाखत यामधून लेखकाचे कार्य, त्यामागची प्रेरणा, त्यांचे कष्ट, त्यांचे प्रयोग समोर येतात.

अशी घडली माणसं, लेखक – डॉ. राजा दांडेकर, उन्मेश प्रकाशन, पृष्ठे – २४०, मूल्य – ३०० रुपये

रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com