lp42राधाकृष्णन पिल्लई हे एक यशस्वी व्यावसायिक असून व्यवस्थापन आणि संस्कृत विषयात त्यांचा अभ्यास आहे. ‘चाणक्य इन यू – अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ अ मॉडर्न किंगमेकर’ या पुस्तकाआधी त्यांनी ‘कॉर्पोरेट चाणक्य’ आणि ‘चाणक्याज सेव्हन सिक्रेट्स ऑफ लीडरशिप’ ही पुस्तके लिहिली आहेत.

पिल्लई यांनी त्यांच्या आजोबांपासून प्रेरणा घेत वाचनाची आवड कशी जोपासली, त्यातही चाणक्याच्या अर्थशास्त्राने त्यांना कसे प्रभावित केले आणि त्या ग्रंथातील सूत्रांचा आयुष्यात प्रत्यक्ष वापर करत ते कसे एक यशस्वी व्यावसायिक आणि श्रीमंत व्यक्ती झाले, असा या पुस्तकाचा ढोबळ मानाने विषय आहे. पुस्तकाची मांडणी काहीशी आत्मकथनपर आहे. संपूर्ण पुस्तकात एकाही पात्राचे नाव नाही हे त्याचे एक वैशिष्टय़. एक लक्ष्यहीन तरुण ते यशस्वी आणि श्रीमंत व्यावसायिक हा प्रवास करताना त्यांना आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या तरुणांना एक संदेश द्यायचा आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात त्यांच्या बालपणी गावाकडे आजोबांच्या आणि इतर भावंडांच्या सान्निध्यात व्यतीत केलेल्या काळाचे वर्णन आहे. आजोबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यातील अनेक वेचे ते नातवंडांना गोष्टींच्या रूपात सांगत असत. त्यातूनच त्यांना वाचनाची गोडी लागली. आजोबांबरोबरील गप्पांमधून त्यांना लक्षात आले की आपण शाळेत जाऊन शिक्षण घेणाऱ्या मोजक्या भाग्यवान मुलांपैकी आहोत. आजोबा सांगत की ज्यांना शिकण्याची संधी मिळाली आहे ते पुस्तके वाचू शकतात आणि त्यातील ज्ञानाचा आपल्या यशस्वी जीवनाच्या पायाभरणीसाठी योग्य तो उपयोग करू शकतात. इतिहासाच्या वाचनाने आपल्या पूर्वसुरींच्या चुका कळून त्या टाळता येतात तर त्यांच्या उपलब्धींपासून प्रेरणा घेता येते. याच संभाषणांमधून त्यांना नेतृत्वाची आस निर्माण झाली. पण प्राचीन भारतीय संस्कृतीत नेतृत्वाला धर्म या संकल्पनेची जोड दिली आहे. त्यातून राजा आणि ऋषी या दोघांचा मिलाफ होऊन राजर्षि ही कल्पना प्रमाण मानली गेली. तसेच आजोबांनी त्यांनी चाणक्याप्रमाणे ‘किंगमेकर’ होण्यातील मोठेपणा समजावून देत महत्त्वाकांक्षेची बीजे रोवली. त्यातून पिल्लई यांना कौटिल्याचे अर्थशास्त्र अधिकच जवळचे वाटू लागले. त्यापुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या महान ग्रंथाने आपल्यासाठी कशी मार्गदर्शक भूमिका बजावली याचे वर्णन पुस्तकात आले आहे. तसेच प्रत्येकाने आपल्यातील चाणक्य जागा केल्यास कसे यशस्वी होता येते हे सांगण्याचा हे पुस्तक म्हणजे एक प्रयत्न आहे.

भारतात धर्म किंवा नीतीला कायम महत्त्व आहे तर पाश्चिमात्य जगात ऐहिक प्रगतीला महत्त्व आहे. आज जागतिकीकरणाच्या लाटेत भारतीय तरुण काहीशा संभ्रमावस्थेत सापडलेले दिसतात. एकीकडे संस्कृती जपणे तर दुसरीकडे जागतिकीकरणाने देऊ केलेल्या प्रगतीच्या संधी घेणे यात आपली कोंडी होताना दिसते. त्यावर एका प्रकरणात चांगला प्रकाश टाकला आहे. लेखकाने एका सन्मानयीय व्यक्तीबरोबर पैसा या विषयावर साधलेला संवाद त्यात आहे. पैसा कमावणे या कृतीला आपल्याकडे कायमच एक दुय्यम किंवा भ्रष्ट कृती मानले गेले आहे. त्याकडे काहीसे वाईटपणाच्या भावनेतून पाहिले जाते. त्यावर लेखकाच्या मार्गदर्शकाने सांगितले की पैसा माणसाला मुक्ती देऊ शकतो. भारत पूर्वी एक संपन्न देश होता आणि तरीही अध्यात्मात प्रगती केली होती. निव्वळ पैसा हा चांगला किंवा वाईट नसतो तर त्याचा वापर किंवा तो मिळवण्यासाठी एखाद्याने अवलंबलेला मार्ग बरावाईट ठरतो. गरिबीत कोणताही मोठेपणा नाही. गरिबाचा सगळा वेळ मूलभूत गरजांच्या विवंचनेतच जातो. जर मुबलक पैसा असेल तर माणूस त्यातून वर येऊन जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो. अध्यात्माचा विचार करू शकतो. इतरांना मदत करू शकतो. पैसा असेल तर आयुष्यात अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पैसा मिळवण्यात आपल्याकडे जी अपराधीपणाची जाणीव आहे तिचा त्याग केला पाहिजे. मात्र पैशाच्या वाईट परिणामांपासून वाचण्यासाठी भारतीय संस्कृतीत त्याची सांगड दैवी भावनेशी घातली आहे. त्याला लक्ष्मी या देवतेचे रूप दिले आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे आणि विष्णू ज्ञानाचे प्रतीक आहे. लक्ष्मी अर्धागिनी म्हणून विष्णूच्या चरणी आहे. यातून हेच सुचवायचे आहे की ज्ञानार्जनावर लक्ष केंद्रित करा, लक्ष्मी आपोआप मागे येईल. हा संवाद उद्बोधक आहे.

अशा अनेक प्रसंगांतून प्रेरणा देण्याचा लेखकाचा प्रयत्न असला तरी पुस्तकाला काहीशी आत्मस्तुतीची बाधा झाली आहे. त्यातील सकारात्मकता कधीकधी कृत्रिम वाटते. तरुणांना उमेद देण्यापुरते ठीक आहे, पण प्रत्यक्ष जीवन इतके पुस्तकी पठडीतून यशस्वी होत नाही. सर्वच लोकांना मार्गदर्शन करण्याच्या नादात पुस्तकाने आपला फोकस काहीसा हरवल्यासारखा वाटतो. तसेच यशस्वी होण्याचे गमक सांगण्याचा दावा करणारी आणि खपाकडे डोळा ठेवून काढलेली व्यावसायिक पुस्तके जशी असतात तशी त्याची धाटणी झाली आहे. ही पुस्तके ठरावीक काळात बेस्टसेलर ठरतात, पण साहित्यिक कृती म्हणून स्थान निर्माण करू शकत नाहीत. हे पुस्तक वाचनीय असले तरी त्यात यशाचे फार सामान्यीकरण (जनरलायझेशन) आणि अती सुलभीकरण (ओव्हर सिंप्लीफिकेशन) केल्यासारखे वाटते आणि पुस्तकाच्या यशाला वरील मर्यादांची किनार असल्याचे दिसते.
चाणक्य इन यू – अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ अ मॉडर्न किंगमेकर
लेखक : राधाकृष्णन् पिल्लई
प्रकाशक : जयको बुक्स
पृष्ठे : २४४
किंमत : २९९ रुपये
सचिन दिवाण – response.lokprabha@expressindia.com