यशवंतराव चव्हाणांनी १९६२ ते १९८४ या काळात संरक्षण, गृह, परराष्ट्रव्यवहार, अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री असताना देशभरातील विद्यापीठांमध्ये तसेच आयआयटी, टीआयएफआर व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार संस्थांमध्ये दीक्षान्त समारंभाच्या वेळेस अथवा इतर महत्त्वाच्या समारंभात केलेली २२ भाषणे कालानुक्रमे ‘माझ्या विद्यार्थी-मित्रांनो..’ या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही भाषणे वाचताना १९५९ ते १९८४ असा एक सलग कालपटच वाचकांसमोर उभा राहतो.

शिक्षणसंस्थांच्या स्नातकांसमोर दिलेली भाषणे शिक्षणाशी संबंधित असली तरीही त्यांच्या प्रत्येक भाषणात देश, समाज, विषमताविरोधातील संदर्भाचा व्यापक पट ते मांडतात. या भाषणांमधून प्रागतिक विचारांचा विकास, आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्णता आणि लोकशाहीचे मजबुतीकरण यांचे चिंतनही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे. यातील प्रत्येक भाषणाचा पोत वेगळा आहे. काही भाषणांमध्ये संरक्षणविषयक प्रश्न आणि संरक्षण सिद्धतेचे विचार अधोरेखित केलेले आढळतात, तर काही भाषणांमध्ये स्त्रियांविषयीचे चिंतन आहे. काही भाषणांमध्ये त्यांनी स्वत:चे अनुभव सांगितले आहेत. विद्यापीठांतील भाषणांतही प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल ते आवर्जून बोलले आहेत. अलिगढ विद्यापीठाचे वैशिष्टय़ लक्षात घेता यशवंतरावांनी मुस्लीम तरुणांना राष्ट्रीय प्रवाहात आवाहन केले आहे.

या भाषणांमधून यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशस्तरावरील महत्त्वाच्या नेत्याची विकासाविषयीची दूरदृष्टी, बहुजन, पददलित, स्त्रिया यांच्याविषयीची कणव आणि त्यांच्या उत्थानासंबंधीची नीती समजून घेता येते. त्यांच्या या भाषणांतून स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाचा पट अलवारपणे उलगडला जातो तर ग्रामीण मागासलेपणासारख्या सामाजिक जटिल प्रश्नांविषयी त्यांना वाटणारी चिंताही प्रतीत होते. प्राचीन भारतीय ज्ञान आणि विज्ञानाचा प्रभाव यांचा मेळ कसा घालायला हवा, याची त्यांना असणारी सुस्पष्टताही या भाषणांमधून जाणवते. शिक्षणाद्वारे त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासोबत समाजाचा विकास साधला जावा, याबाबत त्यांना वाटणारी कळकळ पुढच्या पिढीपर्यंत या भाषणांतून अत्यंत सक्षमपणे पोहोचविण्यात यशवंतराव चव्हाण कमालीचे यशस्वी ठरले आहेत.

माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…, स्व. यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे : संकलन : मोहनराव डकरे, संपादन : प्रा. का. धों. देशपांडे प्रकाशक : रोहन प्रकाशन,पृष्ठसंख्या : २७९, मूल्य : रु. ४९९/-
सुचिता देशपांडे – response.lokprabha@expressindia.com