कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग अशा अनेकविध क्षेत्रात पुण्याचा  कायमच वरचा नंबर लागतो. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यातील पुण्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळं आहेतच, पण खुद्द पुणे शहर हेच एक प्राचीन वारसा लाभलेले पर्यटनस्थळ आहे. याच पुण्याची अगदी इत्यंभूत आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती असणारं पुस्तक म्हणजे ‘मुठेकाठचे पुणे’.  प्र. के. घाणेकर या चिकित्सक इतिहास अभ्यासकाच्या नजेरेतून पुण्याचं हे सारं वैभव वाचणं म्हणजे एक मेजवानीच म्हणावी लागेल. मूळात घाणेकरांची पुण्याशी इतकी घट्ट नाळ जुळली आहे की त्यांनी हे सारं काही अतिशय शोधक पद्धतीने मांडलं आहे.

पुण्याच्या मधोमध वाहणाऱ्या मुठा नदीला धरून पुण्यातील स्थळांची मांडणी त्यांनी यात केली आहे. पुण्याचा अश्मयुगाशी असणारा संदर्भ ते अगदी अलीकडच्या म्हात्रे पुलापर्यंतच्या सुमारे १०० च्या आसपास वास्तू, स्मारकांचा समावेश यात झालेला आहे. पुण्याची भौगोलिक रचना, मुठा नदीचा उगम, पुण्याचा वाढता परीघ, इतिहासकालीन वास्तू, हेरिटज म्हणावं अशा शिक्षणसंस्था, पानशेतचं नातं, इतिहास काळातील हरवलेले दुवे असं सारं काही या पुस्तकातून उलगडते. महत्त्वाचं म्हणजे यातील संदर्भ हे केवळ ऐकीव माहितीवर आधारलेले नाहीत. त्यामुळे केवळ कट्टय़ावरच्या चारचौघांच्या गप्पा अस याचं स्वरूप न राहता त्याकडे एक चांगला संदर्भ म्हणूनदेखील पाहावं लागेल. एक वेगळ्या प्रकारचा पर्यटन मार्गदर्शक म्हणूनदेखील उपयोगी पडणारे आहे.

मुठेकाठचं पुणे, प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, मूल्य रु. २६०/-

प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com