आफ्रिका खंडाशी आपला परिचय तसा बेताचाच. महात्मा गांधींचे अहिंसा आंदोलन, नेल्सन मंडाले यांचा वंशवादविरोधी लढा, दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटची टीम, डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनेल्सवर पाहिलेली तेथील वाळवंट, जंगले आणि प्राणीसृष्टीची चित्रे या पलीकडे आपली त्या खंडाविषयीची माहिती जात नाही. या आकाराने मोठय़ा खंडाविषयी एक गूढ आपल्या मनात दडलेले असते. पण त्या पलीकडे एक अफाट विश्व तेथे दडले आहे.

आफ्रिका खंड साधारण दोन विभागांत वाटला जातो. एक म्हणजे उत्तरेकडील सहारा वाळवंटाचा भाग आणि उरलेला दक्षिणेकडील भाग. उत्तरेचा भाग वैराण वाळवंटाचा आणि तेथील लोकांची धाटणी युरोप व मध्यपूर्वेशी जवळीक सांगणारी आहे. तर दक्षिणेकडील प्रदेश बराचसा जंगलांनी व्यापलेला, नैसर्गिक व खनिजसंपत्तीने संपन्न असून तेथील लोक मुख्यत्वे कृष्णवर्णीय आहेत.

पुढारलेल्या जगाने आपल्याला ऐशारामी जिणे जगता यावे म्हणून सतराव्या-अठराव्या शतकांत तेथील लाखो लोकांना युरोप-अमेरिकेत गुलाम म्हणून जबरदस्तीने नेले. त्यांचा एखाद्या उपभोग्य वस्तूप्रमाणे व्यापारच चालवला. वसाहतवादाच्या काळात युरोप-अमेरिकेने आफ्रिया खंडाकडे एक कच्च्या मालाचा पुरवठा करणारा संपन्न प्रदेश म्हणून पाहिले आणि त्या भूभागाची यथेच्छ लूट केली. तेथील नागरिकांची अतोनात पिळवणूक केली. त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी जुलूम-जबरदस्ती केली. आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे युरोपीय शक्तींनी तह आणि वाटाघाटींदरम्यान आफ्रिकेचा नकाशा टेबलावर ठेवून अगदी पट्टीने रेषा आखाव्यात तशा या भूभागाच्या वाटण्या आपापसांत वाटण्या केल्या. तसे करताना तेथील स्थानिक जमातींची वेगवेगळ्या देशांत विभागणी होत आहे, त्यांची पिढय़ान्पिढय़ांची सामाजिक, सांस्कृतिक वीण उसवली जात आहे, याकडे काही लक्ष दिले नाही. या प्रकारे आफ्रिकेतील सुमारे १९० वांशिक गट विभागले गेले आहेत.

या देशांना जसजसे स्वातंत्र्य मिळाले तसतसे तेथील विविध वांशिक गटांचे संबंध ताणले गेले. ज्या जमाती कृत्रिमपणे एका देशात आल्या होत्या त्यांच्या अस्मिता जाग्या होऊन त्यांनी बंडाचे निशाण उभारले. तर ज्या जमाती वेगवेगळ्या देशांत विभागल्या गेल्या होत्या त्यांनी एकत्रिकरणासाठी लढे पुकारले. शीतयुद्धाच्या काळात महासत्तांनी या स्थानिक संघर्षांचा आपापल्या फायद्यासाठी वापर करून घेतला. हव्या त्या गटाला, फायदा असेल तोवर शस्त्रपुरवठा केला. आफ्रिकेची आधीच मागासलेली जनता या सशस्त्र हिंसाचारात आणखीनच भरडली गेली.

देशोदेशींच्या हुकूमशाही राजवटींचा तेथे नंगानाच सुरू होता. दारिद्रय़, भूक, उपासमारी, रोगराई, हत्याकांडे, रूढी-परंपरा, कर्मकांडे, तांत्रिक-मांत्रिकांवरील अवलंबित्व या दुष्टचक्रातून सावरून काही देशांनी, काही प्रांतांनी व काही माणसांनी आयुष्य सावरले. शिकून-सवरून प्रगती केली. नाव कमावले. पण त्यांचा मार्ग सोपा नव्हता. त्यावर जागोजागी काटे पेरले होते. त्या जनजीवनावर लेखकाने प्रस्तुत पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

लेखक प्रा. (डॉ.) उमेश कदम हे लेखक बाबा कदम यांचे चिरंजीव. त्यांनी देशविदेशांतील विद्यापीठांमधून आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी उच्चशिक्षण- प्रशिक्षण घेतले. ते १९९८ पासून रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. आपल्या कामासाठी ते जगाच्या विविध भागांत फिरले आहेत. २००९ पासून त्यांची नेमणूक आफ्रिका खंडात झाली. तेथील वास्तव्यात आणि कामाच्या ओघात त्यांचा स्थानिक जनतेशी आणि त्यांच्या प्रश्नांशी जवळून संबंध आला. त्यावर आधारित सत्यकथा त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या प्रामुख्याने सहारा वाळवंट सोडून उरलेल्या दक्षिणेकडील प्रदेशातील (सब-सहारन आफ्रिका) आहेत.

तेथील सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी, राजकारण, आंतरराष्ट्रीय सत्तासंघर्षांत झालेली होरपळ, नैसर्गिक साधनसंपत्तीची लयलूट, नागरिकांच्या हालअपेष्टा आणि त्यातूनही तावूनसुलाखून आयुष्य सुकर करण्याची आस, हे सारे या कथांमधून रेखाटले आहे. आफ्रिकेतील काही देशांतील खनिज तेल, हिरे व अन्य मौल्यवान खनिजांच्या व्यापारातील फायद्याचा तेथील सत्ताधारी गटांनी कसा आपल्या लढय़ासाठी शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी प्रयत्न केला, काही गुणवान नेत्यांची सत्ताकारणात कशी फरफट झाली, संघर्षांतील पहिला बळी महिलांचा आणि महिलांची एक भोगवस्तू म्हणून होणारी पिळवणूक, त्याला आलेले संघटित गुन्हेगारीचे आणि वेश्याव्यवसायाचे रूप, त्यातून वाढत चाललेला एड्स आदी विषयही त्या-त्या क्षेत्रातील संबंधितांच्या अनुभवांतून मांडले आहेत.

रूढ अर्थाने हा आफ्रिकेचा राजकीय इतिहास वगैरे नाही. तसा लेखकाचा दावाही नाही. आफ्रिकेविषयी हा काही समग्र माहिती देणारा ग्रंथही नाही. पण तेथील समस्या आणि समाजजीवन यांचा एक कवडसा दाखवणारे, स्वानुभवावर आणि सत्य घटनांवर आधारित हे एक कथन आहे. त्यात एक ताज्या परिस्थितीचे आकलन आहे. नेहमीच्या राजकीय किंवा इतिहासविषयक पुस्तकांत एक मानवी चेहरा हरवलेला असतो. तो या कथनात आहे. तेवढय़ा मर्यादित परिघात हे पुस्तक वाचनीय आहे.

शापित भूमी…, आफ्रिकेतील सत्य घटनांवर, एक अनपेक्षित जीवन, लेखक : उमेश कदम, प्रकाशक : ग्रंथाली, पृष्ठे : २४६; मूल्य : २५०/-

सचिन दिवाण – response.lokprabha@expressindia.com