आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटना घडत असतात, अनेक माणसं भेटत असतात. त्यातील काही जण, काही घटना आपल्या मनात खोलवर रुजतात. पद्मा कऱ्हाडे यांच्याही आयुष्यात आलेली माणसं, घडलेले प्रसंग, त्यातून त्यांनी घेतलेला बोध आणि सकारात्मकता हे त्यांनी ‘स्वान्तसुखाय’ या पुस्तकरूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ते प्रसंग, घटना, माणसं फक्त त्यांच्यावर परिणाम करणारी आहेत असं नाही, तर ती आपणही अनुभवावीत अशीच आहेत. त्यामुळे या पुस्तकातील लेखांतून आपल्यासमोर उघडतो तो एक माहितीचा खजिना.

‘स्वान्तसुखाय’ त्यांनी तीन भागांत मांडले आहे. सद्य:स्थितीविषयक, सामाजिक कार्य आणि व्यक्तीविषयक. त्यातील सद्य:स्थितीविषयक भागातील लेख म्हणजे आपण गप्पाष्टक म्हणू शकू अशा प्रकारचे आहेत. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना आपल्या दृष्टिकोनातून आणखी तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तशाच प्रकारचे लेख या भागात आहेत. नवीन पिढीचे लग्नाविषयी विचार सांगितले आहेत, त्याचप्रमाणे लग्न पाहावे जुळवून या भागात या नवीन पिढीतील तरुण-तरुणींचे लग्न जुळवताना त्यांच्या आई-वडिलांना येणारे विचित्र अनुभव मांडले आहेत. वेगवेगळे घरगुती समारंभ आता वेगळा विचार देऊन जातात याची नोंद त्यांनी अशीही एकसष्टीत घेतली आहे. मैत्री, मैत्रीचे गहिरे रंग, संस्कारांचे महत्त्व यांचीही चर्चा त्या या भागात करतात.

दैनंदिन घटनांकडे केवळ कुणी तरी सांगितली आणि आपण ऐकून सोडून दिली असं न करता त्यावर विचार करून आपली स्वत:ची मतं त्या या भागात मांडतात. त्यात काळजी आहे, वाचणाऱ्याला सजग करण्याचा प्रयत्न आहे, त्याप्रमाणे काही तरी हरवत चालल्याची खंतही आहे. त्यातून पद्मा कऱ्हाडे यांचा प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो.

सामाजिक कार्यात नाव झालेल्या संस्था, माणसं आपल्याला माहीत असतात. मात्र अनेक जण कोणतीही प्रसिद्धी न करता आपलं कार्य करत असतात. त्याचं कार्य खरं तर प्रत्येकानं दखल घ्यावं असंच असतं. असंच समाजोपयोगी वेगळं कार्य करणाऱ्यांची माहिती लेखिका आपल्याला सामाजिक कार्य भागात देतात. अनाथ मुलांचा सांभाळ करणारा नितेश बनसोडे, वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची माहिती समाजासमोर आणणाऱ्या वीणा गोखले, अंधांसाठी सर्व काही करणाऱ्या पुण्याच्या मीरा बडवे, नाशिकमध्ये अंध, ऑटिझम, मतिमंद मुलांसाठी सेन्सरी गार्डनची संकल्पना राबवणाऱ्या ज्योती आव्हाड यांच्या कार्याचा आढावा त्यांनी या भागात घेतला आहे. तसेच इरफानाची शाळा, रस्तेवाले भापकर गुरुजी, पालकांची शिकवणी घेणाऱ्या अनुपमा मुजुमदार आपल्याला इथे भेटतात. पद्मा कऱ्हाडेंनी यातील कित्येकांना अनेक वृत्तवाहिन्यांवर पाहून त्यांना संपर्क साधत त्यांच्या कार्याची अधिक माहिती घेतली. माणसं वाचण्याचं कसब त्यांच्या प्रत्येक लेखात दिसून येतं. त्यांनी या भागात दिलेली माणसं त्यांच्या संस्था, त्यांचं कार्य यांच्या माहितीचा खजिनाच त्या आपल्यासमोर उघडा करतात.

व्यक्तीविषयक भागात त्या प्रत्येक व्यक्ती घटनांतून वाचायला शिकवतात. विजया, रेणुका यांच्याविषयीचे लेख वाचताना त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. सोनाली नवांगुळचा परिचय आतापर्यंत अनेक लेखांतून, वृत्त वाहिन्यांवरून झालेला. मात्र पद्माताईंचे लिखाण इतके संवादी आहे की सोनालीविषयी माहीत असूनही ‘जिद्दीची कहाणी’ पुन:पुन्हा वाचावी अशीच आहे.

‘स्वान्तसुखाय’ असं जरी पद्माताईंनी पुस्तकाला नाव दिलं असलं तरी त्यातील सगळेच लेख स्वान्तसुखाय असे नाहीत. सामाजिक विषयांवरील लेखन आपल्याला विचारात टाकणारे आहे, अंतर्मुख करणारे आहे. त्यांची भाषा, लिखाण अतिशय संवादी असल्याने आपण आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी हितगुज करत असल्यासारखं वाटतं. कित्येक लेखांतील मतं आपणही व्यक्त केलेली असतात, अनेक गोष्टींबाबतची खंत आपल्यालाही वाटलेली असते. फरक एवढाच आहे, की आपण ते मांडण्याचा, बारकाईने त्यावर विचार करण्याचा प्रयत्न केलेला नसतो. तो विचार आपल्याच मनात तसाच ठेवला जातो, कालांतराने तो विरून जातो. पद्माताई यांनी प्रत्येक व्यक्ती, घटना, प्रसंगांवर आवर्जून विचार करून, अधिक माहिती घेऊन ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे, स्वान्तसुखाय म्हणून का होईना.

स्वान्तसुखाय, लेखिका : पद्मा कऱ्हाडे, ग्रंथाली प्रकाशन, मूल्य : २०० रुपये.

response.lokprabha@expressindia.com